Nashik Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटात (NCP Ajit Pawar) सध्या नाराजीचा सूर बघायला मिळतोय. नाशिकचेच राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि देवळाली व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे (Nivrutti Aringale) हे अपक्ष निवडणूक लढवणार आहे.  


यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसेंची (Hemant Godse) डोकेदुखी आणखी वाढलीय. विशेष म्हणजे मला अजितदादांनी वर्षभरापासून तयारीला लागा असा शब्द दिला होता, नाशिक जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे ही जागा आपल्याला घ्यायची आहे, असे अजित पवारांनी म्हटल्याचा दावा अरिंगळे यांनी केलाय. 


म्हणून मी अपक्ष अर्ज भरलाय - निवृत्ती अरिंगळे


निवृत्ती अरिंगळे म्हणाले की, गेल्या 40 वर्षापासून मी काम करतोय. व्यापारी बँकेचा मी अनेक वर्षे अध्यक्ष राहिलो आहे. बँकेचे 75 हजार सभासद लोकसभा मतदारसंघात आहे. शेतकऱ्यांसोबत माझा मोठा संपर्क आहे, मोठे आंदोलने केले आहेत. शहर आणि ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून मी काम करतोय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात नाशिकची जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरलाय. 


भुजबळ साहेबांना उमेदवारी मिळाली नाही याची खंत - निवृत्ती अरिंगळे 


अजित दादा किंवा पक्षश्रेष्ठींशी मी चर्चा करणार आहे.  मला अजितदादांनी वर्षभरापासून सांगितले होते की, येथे आपले तीन आमदार आहेत. ही जागा आपल्यालाच घ्यायची आहे. निवडणूक लढवायची अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.  भुजबळ साहेबांना उमेदवारी मिळाली असती तर आमची हरकत नव्हती. भुजबळ साहेबांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे आम्हाला खंत आहे.  शिवसेनेकडे जागा गेल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे मी लढवण्याचा आग्रह केला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने ओबीसी समाज आक्रमक


दरम्यान, भुजबळांना उमेदवारी डावलून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने नाशिकमध्ये ओबीसी समाजाची आक्रमक झाल्याचे चित्र आहे.  ओबीसी समाजाकडून नाशिकमध्ये होर्डींग्स लावण्यात आले आहेत. आम्ही 70 टक्के ओबीसी आहोत तरीही तिकीट मिळाले नाही. 'आता तरी उठ ओबीसी जागा हो!!' असा  मजकूर होर्डिंगवर लावण्यात आला आहे. मतपेटीत आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


आणखी वाचा 


'तुम्हाला कुठं थांबायचं अन् कुठं जायचं हे स्पष्ट करा', ठाकरे गटाने बंडखोर विजय करंजकरांना सुनावले खडेबोल!