Nashik Veer Dajiba Bashing Miravnuk : धुलिवंदनाला (Dhulivandan) नाशिकची एक अनोखी परंपरा आहे आणि ती म्हणजे वीर दाजीबा बाशिंग मिरवणूक. जवळपास तीनशे वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरु असून हा दाजीबा नवसाला पावणारा देव असून तो सर्वांचे विघ्न दूर करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. विविध देवदेवतांच्या वेशात सहभागी झालेले हे वीर आपल्या घरातल्या देवांना स्नान घालण्यासाठी मंगळवारी पंचवटीतील (Panchavati) गोदातीरी दाखल झाले.


डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा अशी वेशभूषा धारण करून वाजत गाजत या वीर दाजीबाची मिरवणूक निघाली. घरासमोर रांगोळी काढत तसेच ठिकठिकाणी औक्षण करत या दाजिबांचे स्वागत अनेकांकडून करण्यात आले. दाजिबांवर फुलांचा वर्षावदेखील करण्यात आला. दाजिबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. सुमारे 300 वर्षांपासूनची ही परंपरा असून जून्या नाशकातील (Nashik News) बेलगावकर यांच्याकडे ४० वर्षांपासून हा मान देण्यात आला आहे.    


धुलिवंदन साजरी करण्याची नाशिककरांची अनोखी परंपरा


जुन्या नाशकातील बाशिंगे वीर, रविवार कारंजा येथील दाजिबा वीर आणि घनकर गल्लीतील येसोबा वीर यांचे नाशिकच्या मिरवणुकीत प्रमुख आकर्षण असते. याशिवाय घरघरातील नवसाचे वीरही होळीभोवती नाचवले जातात. त्यामुळे गोदाकाठी धुळवडच्या दिवशी यात्राच भरलेली असते. होळी, धुळवड आणि रंगपंचमी साजरी करण्याची नाशिककरांची परंपरा वेगळीच आहे. नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाड संस्कृती असल्याने येथे रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्याचप्रमाणे होळी पारंपरिक पद्धतीने साजरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीच्या दिवशी नवसाचे वीर नाचवले जातात. हे वीर नाचत गोदाकाठी जातात. रामकुंडावर वाजतगाजत वीरांचे टाक आणून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर पुन्हा ते वाजतगाजत घरी आणले जातात, अशी परंपरा नाशिकमधील अनेक घरांमध्ये बघावयास मिळते. 


दाजीबा वीराची अशी आहे परंपरा


मानाचा असलेल्या दाजीबा वीराचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून भाविक येतात. मुला-मुलींचे विवाह जमत नसतील अशांनी या वीराला बाशिंग वाहण्याची परंपरा आहे. हळद लागलेल्या नवरदेवाला मृत्यू आला आणि त्याची लग्नाची इच्छा अपूर्णच राहिली, यामुळे डोक्यावर देवाचा मुकुट अन् बाशिंग बांधून अंगाला हळद लावून आपल्या होणाऱ्या पलीच्या शोधात फिरणारा नवरदेव अशी या वीराची आख्यायिका सांगितली जाते. बेलगावकर घराण्यातील विनोद बेलगावकर यांच्याकडे या पूजेचा मान आहे.


भागवत यांच्याकडील बाशिंगे वीर


दुसरा दाजिबा वीर कै. दत्तात्रय भागवत यांचे चिरंजीव प्रवीण भागवत यांच्या घरातून निघतो. साधारणतः पाच ते सहा पिढ्यांची परंपरा असलेल्या या दाजीबा वीराच्या मिरवणुकीची सुरुवात पुंजाजी भागवत, दत्तात्रय गोपाळ भागवत आदींनी केली होती, मागील १४ वर्षापर्यंत या मिरवणुकीत मानाच्या दाजीबा वीराचा मान प्रवीण दत्तात्रय भागवत यांच्याकडे असून, यंदाच्या वर्षी ज्ञानेश्वर कोरडे यांना दाजीबा वीराचा मान देण्यात आलेला आहे.


आणखी वाचा 


नाशिकच्या जागेचा पेच आणखी वाढणार! नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे मोठी मागणी