Nashik Farmers: 'लय कष्ट करून, रात्र दिवस एक करून पोल्ट्री फार्म उभा केला होता, सात वर्षांची मेहनत पण आज एका तासात सगळी स्वप्न धुळीला मिळाली,' 'तळहाताच्या फोडाप्रमाणे कोंबड्यांना जपलं होतं, आज याचं हातांनी मूठ माती देण्याची वेळ आलीय, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पेठ तालुक्यातील बरडापाडा येथील तरुण शेतकऱ्याने दिली.
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने अनेक गावांची दुर्दशा झाली आहे. पेठ तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला आहे. तालुक्यातील घनशेत, कुळवंडी, आमलोन, शेवखंडी, अभेटी आदींसह बरडापाडा गावात अनेक घरांची दुर्दशा झाली आहे. याच पावसात बरडापाडा येथील तरुण शेतकऱ्यांने जीवतोड मेहनत घेऊन उभारलेली चार एकरवर उभारलेली पोल्ट्री फार्म जमीनदोस्त झाली आहे. जवळपास 13 हजारहून अधिक पक्षांचा वादळी वाऱ्यात मृत्यू झाला आहे.
बरडापाडा गावातील ज्ञानेश्वर भोये, मंगेश इंपाळ या होतकरू तरुणांनी गावाजवळ 2017 मध्ये ही पोल्ट्री फार्म उभारलेली होती. तेव्हापासून एक पोल्ट्रीनंतर दुसरी असं करत चार ठिकाणी शेड उभारून व्यवसायाला गती देण्याचे काम सुरू होतं. ज्ञानेश्वर भोये यांच्या फार्ममध्ये जवळपास नऊ हजारहुन अधिक पक्षी होते. तर, इंफाळ यांच्या फार्ममध्ये सुमारे 4500 पक्षी होते. यासाठी भोये बँकेकडून 14 लाख रुपयांचे लोन काढून ते उभारले होते. मात्र सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यात डोळ्यासमोर सगळा पोल्ट्री फार्म जमीनदोस्त झाला.
बारावी, डीएड केल्यानंतर हाताला काम नसल्याने बँकेकडून लोन घेऊन पोल्ट्री व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. रात्रदिवस एक करून पोल्ट्री फार्म उभाही केला होता, तळहाताच्या फोडाप्रमाणे कोंबड्याना जपलं होतं आणि आज याचं हातांनी मूठ माती देण्याची वेळ आलीय. अशी उद्विग्न प्रतिक्रिया पेठ तालुक्यातील बर्डापाडाच्या ज्ञानेश्वर भोये यांनी सांगितलं. तर ही सगळी परिस्थिती सांगताना ज्ञानेश्वर यांच्या डोळ्यात आपसूक पाणी आले. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी म्हणाल्या की यांना नोकरी नसल्याने बँकेतून कर्ज काढलं तर फार्म उभारलं, पण काही मिनिटांत आमची सगळी स्वप्न धुळीला मिळाली आहेत. आता कस करायचं आम्ही, एक पक्षी शिल्लक राहिला नाही, दुसऱ्या दिवशी लॉट जाणार होता, मात्र आदल्या दिवशी अवकाळी पाऊस बरसला आणि होत्याचं नव्हत झालं, अशी प्रतिक्रिया भोये यांच्या पत्नीने दिली आहे.
दरम्यान ज्ञानेश्वर भोये म्हणाले, डीएड केलं, नोकरी नव्हती, म्हणून बँकेकडून चौदा लाखांचे कर्ज काढलं. अन् फार्म उभारलं. मात्र एका क्षणात चाळीस लाखाचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा उभारायचे म्हटल्यावर कमीत कमी दहा लाख रुपयांचा खर्च आहे. त्यातही साधारण एक महिना हा उभारणीसाठी लागू शकतो. सोबत असलेल्या मंगेश इंफाळ यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. यातील 13 हजार पक्षी मृत झाले असून सध्या ट्रॅक्टरद्वारे विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे. तर काही कोंबड्या शिल्लक आहेत, त्या देखील गारपिटीने झोडपून काढल्या आहेत. एकूणच या युवा शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पेठ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे.
शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी
बरडापाडा गावातील शेतकरी ज्ञानेश्वर भोये यांचे डीएड झाले असून त्यांनी कर्ज काढून हा पोल्ट्री फार्म उभारला होता. इतर कुठलेही काम न करता रात्र दिवस एक करून पोल्ट्री फार्मला जपत होतो. पण काय झालं, अन सगळं स्वप्न धुळीस मिळाले आहे. काय करू काही समजत नाही, हातात काहीच राहील नाही, डोळ्यांसमोर सगळ्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. हे सगळी आपबीती सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी होतं. सरकारने याबाबत वेळीच लक्ष देऊन या शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
तीन दिवसांपासून झोपलो नाही!
ज्या दिवशी ही घटना झाली, त्यानंतर फार्मचे पत्रे दूरवर उडून गेले आहेत, खांब कोसळून गेले आहेत. खाद्य अस्ताव्यस्त पडले आहे. मृत कोंबड्याच्या खच पडला असू न दोन ट्रॅक्टरद्वारे विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे. शासन दरबारी पंचनामा झाला असला तरी किती मदत मिळेल? याची शाश्वती नाही. त्यामुळे सद्यस्थितीत दोघा नवरा बायकोसमोर झालेले नुकसान गोळा करण्यापलीकडे काहीच उरला नाही. तीन दिवसांपासून झोपलो नसल्याचे भोये दांपत्य म्हणाले.