Nashik News : गेल्या चार दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपीट सुरु आहे. यामुळं जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, दिंडोरी अशा 11 तालुक्यातील गावात अक्षरशः थैमान घातलं आहे. या भागातील जवळ-जवळ 145 गावातील 8468 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये कांद्याचे सर्वाधिक नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळं शेतकऱ्यांना अश्रूही अनावर झाले आहेत. आभाळचं फाटलं तिथं ठिगळं कुठं लावायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
कोणत्या पिकाचं किती नुकसान?
अवकाळी पावसामुळं नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे 5814 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. डाळिंबाचे 773 हेक्टर, द्राक्षबागा 755 हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. इतर शेतीपिकं जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीमुळं नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे.
काढणीला आलेला कांदा सडू लागला
गेले तीन महिने शेतात राब राब मेहनत करुन रात्र-पहाट न बघता कांद्याला पाणी भरलं. एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करुन पोटच्या लेकराप्रमाणं कांद्यासह इतर पिकं सांभाळली. पिक हाताशी आलं अन सारं काही निसर्गाने हिरावून नेलं. अवकाळीने होत्याच नव्हतं केलं अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. शेतातील उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. काढणीला आलेला कांदा तसेच शेतात काढून ठेवलेला कांदा सडू लागला आहे.
ज्यांनी बाजार समितीत कांदा विकला त्यांना सरसकट अनुदान द्यावे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्र्यांसह आमदार, खासदार, मंत्री राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. शेतकऱ्याला आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आभाळचं फाटलं तिथं ठिगळं कुठं लावायचं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मायबाप सरकार आम्ही शेतकऱ्यांनी आता काय करावं अशी आर्त साद नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतऱ्यांनी दिली आहे. एक तर कांद्याला भाव नाही म्हणून शासनाने सानुग्रह अनुदान 350 रुपये जाहीर केले. त्यातही पिकफेऱ्यासह इतरही अटी-शर्ती घालून दिल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यातच अवकाळीने दणका दिल्यानं बळीराजा पुरता कोलमडला आहे. सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ' ई पीक पेरा ' अट रद्द करावी. ज्यांनी बाजार समितीत कांदा विकला त्यांना सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका
आस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी नेहमीच भरडला जातो. शेतकऱ्याला यंदा कांदा पिकांमुळे येणाऱ्या पैशाची आस लागली होती. मागील नुकसानीची भर यातून निघणार होती. पुढील वर्षाचे शेतीची आर्थिक नियोजन देखील बसणार होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही बसल्यानं जगावं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडे मदतीची मागणी होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: