धुळे : मोदी सरकार थापेबाज सरकार आहे. थापेबाज सरकारला पुन्हा निवडून आणायचे नाही. दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ मात्र जर कोणी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर वाघ नखं बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शोभाताई बच्छाव या उद्याच्या खासदार आहेत. शोभाताई तुम्ही योग्य वेळी उमेदवारी घेतली आहे. गेली दहा वर्ष ज्यांना तुम्ही निवडून दिलं होतं त्यांच नातं धुळेकरांनी पाहिलं आहे. समोर जे उमेदवार आहेत ते सुरुवातीला आमच्याकडे होते तसे ते गद्दारच आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुभाष भामरेंवर टीका आहे. दोन वेळा खासदार झाल्यानंतर त्यांना धुळे त्यांची खाजगी मालमत्ता वाटायला लागली. हा धुळेकर तुमचा विजय केल्याशिवाय थांबणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला .
यंदा महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही
नगरमध्ये मोदींची सभा झाली. त्यांच्या भाषणावरून त्यांच्यावर आई-वडिलांनी संस्कार केले आहे की नाही? हा प्रश्न मला पडला आहे. मोदी तुम्ही कुठून आलात. तिथले संस्कार आम्हाला माहित नाही. मात्र महाराष्ट्रातल्या मातीतले संस्कार आम्हाला माहित आहेत. मोदीजी महाराष्ट्राने तुम्हाला दोन वेळेस 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले होते. म्हणून तुम्ही दिल्ली पहिली होती. यावेळेस महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
चार जूनला लोक भाजपला केराची टोपली दाखवणार
उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, चार जूनला लोक भाजपला केराची टोपली दाखवणार आहेत. भाजपने माझ्याशी नाही तर शेतकऱ्यांशी गद्दारी केली आहे. पाच जूनला आमचे सरकार दिल्लीत आलेले असेल. मग तुम्ही कुठल्याही बिलात लपले तरी आम्ही तुम्हाला उलटे लटकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली आहे.
शोभाताई बच्छाव तुम्हाला धुळेकर जनता निवडून देणार
आठ दिवसानंतर जे तुम्हाला पाणी देतात. त्यांना पाच वर्षानंतर तुम्ही पाणी पाजणार आहात की नाही? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी धुळेकरांना विचारला. राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी शोभाताई बच्छाव तुम्हाला धुळेकर जनता निवडून देणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
प्रज्वल रेवण्णाला पकडून आणून मोदींच्या गळ्यात बांधणार
बहिण भावाच्या नात्याला अपवित्र करणाऱ्या लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केली. प्रज्वल रेवण्णासाठी मोदी मत मागतात. जो प्रज्वल रेवण्णा आज पळून गेला आहे. आमची सत्ता आल्यावर प्रज्वल रेवण्णाला पकडून आणून मोदींच्या गळ्यात बांधणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे. दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ मात्र जर कोणी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर वाघ नखं बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा