Maharashtra Nashik News: घरातील लहान मुलांकडे वेळोवेळी लक्ष देणं महत्वाचं असतं. पालकांचं लक्ष विचलित झाल्यास बरेवाईट होण्याची शक्यता असते. मात्र कधी कधी असा प्रकार होऊनही बाळ सुस्थितीत असतं. असाच काहीसा प्रकार नाशिक शहरात समोर आला आहे. चौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडा सुखरूप असल्याची सुखद घटना समोर आली आहे.


काही महिन्यांपूर्वी घरात अडकलेल्या आपल्या बाळासाठी आईने जीव धोक्यात घालून या मजल्यावरून त्या मजल्यावर जाण्याचे धाडस केले होते. ही घटना चांगलीच चर्चेत आली होती. अशातच 'देव तारी, त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय नाशिककरांना आला. चौथ्या मजल्यावरून पडूनही तीन वर्षांचा चिमुकला सुखरूप असल्याची सुखद घटना नाशिकरोड पूर्व भागातील चेहडी पंपिंग भागात घडली. 


नाशिकरोड येथील पूर्व भागातील चेहेडी पंपिंग परिसरातील भगवा चौक परिसरातील साई आदेश सोसायटीत राहणारा तीन वर्षांचा शिवांश पुरुषोत्तम गोरडे सोमवारी दुपारी चारच्या सुमारास झोपलेला असल्याने घराचा दरवाजा लावून आई पुनम या मुलीला क्लासला सोडविण्यासाठी गेल्या होत्या. थोड्या वेळाने शिवांशला जाग आली, झोपेतून उठून तो गॅलरीत आला, मात्र यावेळी त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. मात्र दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीवर दोन फूट रुंद पत्र्याच्या छतावर आदळल्याने मोठा आवाज झाला. त्यानंतर तिथून खाली पेव्हर ब्लॉकवर धाडकन पडला. 


पालकांच्या पायाखालची जमीन हादरली....


चौथ्या मजल्यावरुन पडल्याचं नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी धाव घेतली. शिवांश बेशुद्ध अवस्थेत असताना दिपक गुरव, अनिल दराडे, बबलू ताजनपुरे आणि नागरिकांनी तातडीनं त्याला खाजगी रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती समजताच शिवांशची आई आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडत हॉस्पिटलकडे धाव घेतली. तीन वर्षांचे बाळ इतक्या उंचावरून पडल्याने पालकांच्या पायाखालची जमीन हादरली होती. वैद्यकीय तपासणीत शिवांशमच्या शरीरात कोणतीही गंभीर इजा दिसून आली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले, मात्र उपचार आणि तपासणी सुरु असल्याचे वडील पुरुषोत्तम गोरडे यांनी सांगितले.


देवच धावून आला, आईची प्रतिक्रिया...


या प्रसंगानंतर शिवांशची आई पूनम म्हणाल्या की, सकाळी मुलीला क्लासला सोडविण्यासाठी गेले असता ही घटना घडली. बाहेर पडले तेव्हा शिवंश झोपलेला होता. त्यामुळे त्याला घेऊन गेले नाही. मात्र फ्लॅटच्या गॅलरीला तीन फुटांची रेलिंग असताना गॅलरीतून तो कसा खाली पडला, हे समजले नाही, मुलगा वाचला हे महत्त्वाचं असल्याचे ती माऊली म्हणाली.