SSC Exam : दहावीच्या पेपरदरम्यान (SSC Exam) कॉपी (Copy) करु न दिल्याने विद्यार्थ्यांनी (Students) शिक्षकावर (Teacher) दगडफेक (Stone Pelting) केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये (Manmad) घडली आहे. या दगडफेकीत शिक्षकाच्या डोक्याला आणि डोळ्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश दिनकर जाधव असं जखमी शिक्षकाचं नाव आहे.


नेमकं काय घडलं?


राज्यात एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे. मात्र दुसरीकडे कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांकडूनच शिक्षकावर हल्ला होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. दहावीचा काल (20 मार्च) विज्ञान 2 या विषयाचा पेपर होता. मनमाडमधील एच ए के हायस्कूलमध्ये शिक्षक निलेश दिनकर जाधव यांच्यावर बोर्डाच्या परीक्षेत सुपरव्हिजनचं काम सोपवण्यात आलं होतं. निलेश दिनकर जाधव हे विद्यालयातील कलाशिक्षक आहेत. पेपर दरम्यान परीक्षक असलेल्या निलेश जाधव यांनी कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थी संतप्त होते. पेपर सुटल्यानंतर सुपरपव्हिजन संपवून निलेश जाधव हे बाहेर पडत असताना, विद्यार्थ्यांमधून काही मुलांनी जाधव यांच्या दिशेने दगडफेक केली. या हल्ल्यात डोक्याला आणि डोळ्याला दगड लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जाधव यांचा गोंधळ उडाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं.


एकीकडे कॉपीमुक्त अभियान, दुसरीकडे शिक्षकावरच हल्ला


या घटनेप्रकरणी शिक्षक जाधव यांच्या तक्रारीवरुन मनमाड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे कॉपीमुक्त अभियानाला शासन गती देत असताना दुसरीकडे मात्र कॉपी करु न दिल्याने शिक्षकावरच हल्ला होत असल्याने ही घटना गंभीर मानली जात आहे. या गंभीर प्रकाराने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. 


बोर्डाच्या नियमानुसार मी जबाबदारीने काम करत होतो, शिक्षकाची प्रतिक्रिया


माझ्यावर परीक्षेदरम्यान सुपरव्हिजनचं काम सोपवण्यात आलं होतं. बोर्डाच्या नियमांनुसार मी माझं कामकाज करत होता. यावेळी मी विद्यार्थ्यांना कॉपी करु दिली नाही. याचा राग विद्यार्थ्यांच्या मनात होता. पेपर संपल्यानंतर शाळेच्या गेटजवळ गणवेशातील विद्यार्थांपैकी काहींनी दगडफेक केली. यात माझ्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणाची तक्रार मनमाड शहर पोलीस ठाण्यात केली आहे, अशी प्रतिक्रिया जखमी शिक्षक निलेश जाधव यांनी दिली.


हेही वाचा


Nashik News : धक्कादायक! दहावीच्या पेपरची तयारी सुरु होती, शिक्षक जमिनीवर कोसळले, विद्यार्थ्यांचा हंबरडा!