नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर महापालिकेच्या (Nashik NMC) आराखड्यात साठ टक्के कपात करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Pravin Gedam) यांनी निधी (Fund) मिळण्याची शक्यता नसल्याने छाननी केली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी कुंभमेळ्याशी निगडित कामांचा समावेश करण्याच्या सूचना मनपाला दिल्या आहेत. महापालिकेचा अत्यावश्यक आराखडा आता 15,000 कोटींवरून 7,000 कोटींवर आला आहे.
आगामी 2027-28 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतर मनपाचा आराखडा पंधरा हजारांहून थेट सात हजार कोटीपर्यंत खाली आला आहे. जवळपास साठ टक्के फुगवटा कमी आला असून अत्यावश्यक कामाचा त्यात सहभाग करण्यात झाला आहे. मनपा प्रशासनाने सुधारित आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
15 हजार 172 कोटींचा आराखडा केला होता सादर
महापालिकेने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे 15 हजार 172 कोटींचा आराखडा सादर केला होता. परंतु, हा आराखडा अवास्तव असल्याने आणि एवढा निधी मिळण्याची शक्यता नसल्याने त्याची छाननी करून तो कमी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. साधू महंत व त्यांचे आखाडे तसेच देश विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिकला येणार आहेत. महापालिकेने कुंभमेळा अनुषंगाने पायाभूत सुविधा व विविध विकासकामांचा प्रारूप आराखडा तयार केला होता.
आठ हजार कोटींची कपात
त्यात प्रामुख्याने साधुग्राम व पार्किंगसाठी जागा, तिचे भूसंपादन यावरच साडेआठ हजार कोटींचा खर्च धरण्यात आला होता. अंतर्गत रिंगरोड, शहरातील रस्ते व पूल, साधुग्राममध्ये पायाभूत सुविधा या बांधकाम विभागाशी निगडित सहा ते सात हजार कोटींची कामे होती. वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत, घनकचरा संकलन, सफाई कर्मचारी आउट सोर्सिंग, ड्रेनेज, मलनिस्सारण गोदा स्वच्छता व सुशोभीकरण, आदी विभागाच्या कामांचा समावेश होता. हा आराखडा तब्बल पंधरा हजार कोटीवर गेला होता. मनपा प्रशासनाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांच्यासमोर हा आराखडा सादर केला होता. तेव्हा त्यांनी मनपा प्रशासनाचे कान टोचत अत्यावश्यक कामांचा समावेश करा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तसेच जिल्हाधिकारी शर्मा यांनीही कुंभमेळ्याशी निगडित कामांचा समावेश करा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने आराखड्यात काटछाट करत तब्बल आठ हजार कोटींची कपात केली आहे.
आणखी वाचा
Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत