Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला (Mahayuti) स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj) मोठे टेन्शन आहे. शांतीगिरी महाराजांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीच्या नेत्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतांनाच दुसरीकडे शांतिगिरी महाराजांचे शहरभर लागलेले भलेमोठे होर्डींग्स सध्या चर्चेचा विषय ठरतायत.


'जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं' असा मजकूर या होर्डिंग्सवर लिहिण्यात आला असून एकप्रकारे या माध्यमातून सूचक इशाराच महायुतीला देण्यात आला आहे. महायुतीकडून नाशिकसाठी तिकीट मिळावे अशी महाराजांची ईच्छा होती, उमेदवारी अर्ज भरतांना देखील त्यांनी एबी फॉर्म मिळाला नसतांना देखील शिवसेनेच्या (Shiv Sena) नावाने तो भरल्याने महाराजच युतीचे उमेदवार असणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. 


शांतीगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवण्यास ठाम 


नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणा झाल्याने बाबाजी भक्त परिवार नाराज आहे. शांतीगिरी महाराजांचा माघार घेण्यास नकार असून ते अपक्ष लढवण्यावर ठाम असल्याची माहिती बाबाजी भक्त परिवाराने दिली असून महाराजांमुळे हेमंत गोडसेंना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 


शांतीगिरी महाराज माघार घेतील - हेमंत गोडसे


दरम्यान, शांतीगिरी महाराजांबाबत हेमंत गोडसेंनी सूचक वक्तव्य केले आहे. हेमंत गोडसे म्हणाले की,  शांतीगिरी महाराजांचे म्हणणं ऐकून घेतले जाईल आणि ते माघार घेतील असा आम्हाला विश्वास आहे. शांतीगिरी महाराजांचा आम्ही सन्मान करतो. धार्मिक स्थळं असतील किंवा इतर त्यांच्या मागण्या आम्ही मार्गी लावू, अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली आहे.


विजय करंजकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल


दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर लोकसभा लढवत आहेत. तर शांतीगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. विजय करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हेमंत गोडसेंना दिलासा मिळाला आहे. नाशिकमधून कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा 


नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठामच, महायुतीकडून मनधरणीसाठी जोरदार हालचाली