Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये (Warkari) मोठा उत्साह बघायला मिळतोय. महाराष्ट्रभरातून सहाशे अधिक दिंड्या आणि जवळपास पाच लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वरला मुक्कामी पोहोचणार आहेत.
त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आज ठिकठिकाणी विविध जिल्ह्यातील दिंड्या नजरेस पडत असून हरिनामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय आणि भगवेमय झालय. दुपारी अंजनेरीजवळील ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात श्री क्षेत्र जायखेड्याच्या (Jaikheda) हजारो वारकऱ्यांचा शिस्तबद्ध आणि नयनरम्य, असा भव्य रिंगण सोहळा पार पडला आहे.
असा रंगतो नयनरम्य रिंगण सोहळा
सर्व वारकरी, झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी, मृदुगवादक गोलाकार उभे राहतात. माऊली माऊली म्हणत हरिनामाचा गजर सुरू होतो. टाळ मृदुगाच्या एकाच तालात आणि एकाच लयित वारकरी नाचू लागतात. यानंतर दिंडीतील अश्व गोलाकार फिरत पालखीला प्रदक्षिणा मारतात. अशा पद्धतीने हा रिंगण सोहळा पार पडतो. रिंगण होताच आट्यापिट्या, एकीबेकी यासोबतच महिलांच्या फुगड्या खेळल्या जातात.
वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये अशा उपाययोजना करा - मुख्यमंत्र्यांच्या सूचना
या सोहळ्याचे नियोजन करताना प्रशासनाने याला नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून या सोहळ्याकडे पाहावे. या यात्रोत्सवासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना स्टिकर पुरवून अशा वाहनांना टोल माफी देण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत त्यांनी दिल्या. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव सर्वांच्या समन्वयातून आणि सहकार्यातून नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
त्र्यंबकमध्ये यंदाच्या यात्रेसाठी होणार्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस (Police) प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये 2 डीवायएसपी, 6 पीआय, 21 पुरुष पीएसआय व एपीआय, 4 महिला अधिकारी, 210 पोलीस अंमलदार पुरुष आणि 60 महिला व पुरुष अंमलदार यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार आहे.
सीसीटीव्हींची करडी नजर
त्र्यंबकेश्वर येथील यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक येत असल्याने वारकर्यांची मोठी गर्दी होते. त्यावेळी या गर्दीचा फायदा घेत काही चोरटे संधी साधण्याची शक्यता असते. तसेच लहान मुले देखील गर्दीत हरवत असतात. त्यासाठी त्र्यंबक नगरपरिषदेने चोख व्यवस्था केली असून शहरातील विविध ठिकाणी ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच नगरपरिषदेत सर्व विभागांसाठी वॉर रूम तयार करण्यात आले असून यामध्ये यात्रेत हरवलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी स्वतंत्र वॉर रुमची व्यवस्था करण्यात आली आहे.
आणखी वाचा