Nashik Lok Sabha Constituency नाशिक : राज्यात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) रस्सीखेच सुरू आहे. ही जागा शिवसेना लढवेल अशी स्थिती होती. मात्र आता नाशिक लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जुंपल्याची माहिती मिळत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघावर शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोन्ही पक्षांनी दावेदारी केली आहे. वरिष्ठांमध्ये जागा वाटप चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये महाविकास आघडीच्या नेत्यामध्ये जुंपल्याने चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद नाही. शिवसेनाचा उमेदवार नाशिकमधून निवडून येऊ शकत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी केला आहे. गोकुळ पिंगळे (Gokul Pingale) यांच्या दाव्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमध्ये शिवसेनेचीच ताकद
तर दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेनेचीच ताकद आहे, असा दावा शिवसेना उबाठा गटाने करून शरद पवार गटावर पलटवार केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर हेच निवडून येणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.
काय म्हणाले गोकुळ पिंगळे?
तीन वेळा राष्ट्रवादी आणि काँग्रेस विचारांचे खासदार नाशिकमध्ये निवडून आले आहेत. मागील दोन वेळेस शिवसेनेचे खासदार होते. त्यावेळी ओबीसी मराठा असा काही वाद झालेला नव्हता. पण आताची परिस्थिती पाहता नाशिक मतदारसंघ हा मराठा प्राबल्य असणारा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मानणारा हा मतदारसंघ आहे. शिवसेनेचा कुठलाही आमदार या मतदारसंघात नसताना तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने लढावा, अशी मागणी सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांची आम्ही ११ तारखेला भेट घेणार आहोत.या मतदारसंघासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, अशी प्रतिक्रिया गोकुळ पिंगळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
काय म्हणाले सुधाकर बडगुजर?
शिवसेनेची ताकद निश्चितच आहे. जर ताकद नसती तर शिवसेनेचा खासदार कसा निवडून आला असता. शिवसेना नाशिक मतदारसंघासाठी तयारी करत आहे आणि शिवसेना ही जागा लढणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या