Political News : राज्य सरकारकडून मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यभरातले ओबीसी नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अहमदनगर येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले होते, मी अडीच महिन्यांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनामा संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) भुजबळांना टोला लगावलाय. नीलम गोऱ्हे आज नाशिक दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेतले. त्यावेळी बोलताना मंत्री भुजबळांना त्यांनी घरचा आहेर दिलाय. काय म्हणाल्या त्या?


 


 "राजीनाम्याची रुग्णासारखी अवस्था"


राजीनामा प्रकरणावरून विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मंत्री भुजबळांना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या राजीनामा जिवंत असतो, कधी खिशात असतो, कधी दिलेला कधी न स्वीकारलेला असतो. अशी राजीनाम्याची रुग्णासारखी अवस्था मला दिसत आहे भुजबळांच्या राजीनाम्याचा विषय हा राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीतला आहे.



"ते मुख्यमंत्र्यांच्या हातात" राजीनामाबाबत छगन भुजबळ म्हणतात...


राजीनामाबाबत छगन भुजबळ म्हणाले, सरकारला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अंबडच्या सभेपूर्वी मी राजीनामा दिला होता. आता तो स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा ते मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. सध्या खुर्चीला चिकटून बसलो अशी माझ्यावर टीका होत आहे. मात्र मी राजीनामा कधीच दिला आहे



माझ्या बाबतचा 'तो' व्हिडीओ चुकीचा - छगन भुजबळ


छगन भुजबळांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होतोय. त्याबाबत स्पष्टीकरण देताना भुजबळ म्हणतात, नाव्ही समाजाबाबत सध्या जो माझ्या बाबतचा व्हिडीओ फिरवला जात आहे, तो चुकीचा आहे. एका गावामध्ये नाही समाजातील व्यक्तीने फेसबुकला मराठा समाजाच्या विरोधात पोस्ट लिहिली त्यावेळी त्याच्या दुकानात केस दाढीसाठी जाऊ नये असं मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आलं त्या अनुषंगाने मी बोललो आहे.  माझा कुठेही नाव्ही समाजाला दुखावण्याचा हेतू नव्हता. जाणीवपूर्वक तोडून मोडून शब्द वापरले जात आहेत


 


मराठा सर्वेक्षणाबाबत भुजबळ म्हणाले...


मराठा सर्वेक्षणाबाबत छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिलीय, ते म्हणाले, हे सर्वेक्षण होणं शक्य आहे का? इतक्यात सर्वेक्षण होत असतं? सर्वेक्षणात दिडशे प्रश्न आहेत. इथे 50-50 सर्वेक्षण होत आहेत. 40-45 मिनिटे लागतात. हे जात विचारतात आणि 80-80 प्रश्नांची उत्तरे आपोआप भरली जातात.


 


 


हे ही वाचा>>


मोठी बातमी! एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली, लिलाव होण्याची शक्यता; गिरीश महाजनांची माहिती