Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीत मात्र नाशिकच्या जागेवर दररोज नवनवीन नावे समोर येत आहेत. या जागेसाठी महायुतीतील (Mahayuti) तीनही पक्षांनी दावा ठोकल्याने जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

  


एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकमधून पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावत आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांनी अचानक माघार घेतली. तर भाजपने देखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत नाशिक जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


नाशिकची जागा 100 टक्के शिवसेनेचीच


आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी नाशिक लोकसभेबाबत मोठं वक्तव्य केले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, नाशिकचा जागा शिवसेनेचीच असून आहे. त्याची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी होणार आहे. आता आज-उद्याचा विषय संपला आहे. भुजबळांच्या निकटवर्तीयांना अर्ज घेण्याचा अधिकार आहे. मात्र 100 टक्के ही जागा शिवसेनेची आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 


भुजबळांच्या निकटवर्तीय खैरेंनी घेतला उमेदवारी अर्ज


दरम्यान, छगन भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत जाहीर माघार घेतली होती. छगन भुजबळांच्या माघारीनंतर त्यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे (Dilip Khaire) यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरे (Ambadas Khaire) यांनी अर्ज घेतला आहे. नाशिक लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण असणार हे निश्चित होण्याआधीच महायुतीतील नेत्यांकडून अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. 


संजय राऊतांनी पराभव स्वीकारलाय - संजय शिरसाट


दरम्यान, संजय राऊत यांनी ईव्हीएम बंद पडणे हे भाजपचे षड्यंत्र असल्याची टीका केली. याबाबत संजय शिरसाट यांना विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत यांची प्रतिक्रिया पाहता त्यांनी पराभव स्वीकारला आहे. एकाच मतदारसंघात 200 बूथ आहे. त्यात एखादे मशीन खराब झाले म्हणजे आक्रोश करणे, म्हणजेच त्यांनी पराभव स्वीकारलं आहे.  


आणखी वाचा 


ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार