Sanjay Raut on Vasant More Resignation : पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. वसंत मोरे यांचा राजीनामा मनसेसाठी (MNS) मोठा धक्का मानला जात आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


संजय राऊत म्हणाले की, वसंत मोरेंनी रामराम ठोकला. यावर मी काय मत व्यक्त करू. त्यांनीच मत व्यक्त केले पाहिजे रामराम का ठोकला? लोकसभा लढवणार आहे तर कुठून लढणार आहे? फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये? एवढीच इच्छा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


शरद पवार यांची भेट घेणे काही वाईट नाही


ते पुढे म्हणाले की, रवींद्र धंगेकर यांच्या सारखे वसंत मोरे, चांगले कार्यकर्ते आहेत. शरद पवार यांची भेट घेणे काही वाईट नाही, ते देशाचे नेते आहेत. त्यांच्यासोबत भेट घेतली असेल तर त्यातून त्यांनी काहीतरी चांगलं घ्यावे, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी वसंत मोरेंना दिला आहे. 


मी राहुल गांधींच्या सभेच्या तयारीसाठी आलोय 


राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात धडकली आहे. यावर संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की,  मी राहुल गांधींच्या सभेच्या तयारीसाठी आलो आहे.  चांदवडला सभा आहे, त्यांच्या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला होईल.  जनतेत जागृतता होईल आणि परिवर्तन घडले, असे त्यांनी म्हटले आहे. 


संजय राऊत कधीच खोटं बोलत नाही


वंचित बहुजन आघाडीने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत, असे खोटे विधान संजय राऊत माध्यमांसमोर करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, संजय राऊत कधीच खोटं बोलत नाही. मी डॉ. आंबेडकर यांच्या विचारला मानणारा नेता आहे. ते सत्य मानणारे होते, मी सत्य सांगतो.  हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीत यावे. संविधान टिकवून ठेवण्यासाठी मी जर बोलत असेल तर यावर माझ्याकडे उत्तर नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


प्रकाश आंबेडकर यांनी बरोबर राहायला हवे


महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावर संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत महाविकास आघाडीतील कोअर कमिटीचे सदस्य आहेत.  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कोणताही तिढा नाही.  प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यायला पाहिजे.  आम्ही त्यांना 4 उत्तम जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी ज्या जागांची मागणी केली होती त्या जागा आहेत.  प्रकाश आंबेडकर यांनी बरोबर राहायला हवे.  प्रकाश आंबेडकर खोटं बोलत आहे असे मी म्हणणार नाही. प्रकाश आंबेडकर यांना त्या जागांची माहिती आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा


Vasant More : मी परतीचे दोर स्वत: कापले, पुणेकर माय-बाप समजून घेतील, वसंत मोरे ढसाढसा रडले!