नाशिक : पंचवटी (Panchavati) येथील हिरावाडी (Hirawadi) परिसरातील स्व. सदाशिव भोरे कलामंदिर (Sadashiv Bhore Kala Mandir) हे उद्घाटनानंतरही कलाकारांसाठी खुले न केल्यामुळे कलाकारांकडून नाराची व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते फित कापून या कलामंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.
नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) पाच एकरात 25 कोटींचा निधी खर्चून हे भव्य असे कला मंदिर उभे केले आहे. कला मंदिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून यंत्रणा देखील उभी करण्यात आले आहे. कोट्यवधींच्या वस्तू अधिक काळ बंद राहिल्यास त्या वस्तू वापराअभावी खराब होण्याची देखील भीती निर्माण झाली आहे. अनेकदा हे कार्यक्रमांसाठी कला मंदिर मिळावे अशी मागणी देखील कलाकारांकडून केली जाते.
कलाकारांमध्ये प्रचंड नाराजी
महानगरपालिका प्रशासनाकडून हे कला मंदिर बंद अवस्थेत असल्यामुळे कलाकारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पुढच्या महिन्यात या कला मंदिराच्या शुभारंभाला पाच वर्षे पूर्ण होणार आहे मात्र तरी मनपा प्रशासनाने उपाययोजना करून नाट्यगृह नाशिककरांसाठी खुले करावे अशी मागणी आता नाशिककर करत आहे. हे कला मंदिर सुरू झाले तर नाशिकच्या कलाकारांना वाव मिळेल आणि हक्काचे कला मंदिर देखील उपलब्ध होईल त्यासोबत मनपाच्या उत्पादनात देखील भर पडेल.
महापालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
कोटींचा निधी खर्चून कला मंदिर उभे केले असले तरी ते धूळखात अवस्थेत पडून असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. कला मंदिराच्या काचा देखील निखळून पडल्या आहे. कला मंदिराच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व बाबींकडे महापालिका प्रशासन मात्र सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा निदर्शनास येत आहे. नाशिक ही कलाकारांची भूमी असून येथे कलाकारांच्या प्रश्नांना न्याय मिळत नसेल तर तो अपमानच असल्याचे म्हणत नाशिकच्या कलाकारांना भोरे कला मंदिर खुले करावे, अशी मागणी जेष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक सुरेश गायधनी यांनी केली आहे.
कसे आहे कला मंदिर?
- सहा एकरात 25 कोटी खर्च करून भव्य कला मंदिर
- चार वर्षाच्या आतच कला मंदिराचे बांधकाम पूर्ण
- कला मंदिराच्या पश्चिमेला प्रशस्त वाहनतळ
- नाट्यगृहात अत्यावश्यक सुखसुविधा
- नाट्यगृहाच्या दोन्ही बाजूस प्रसाधनगृह
- नाट्यगृहात स्वतंत्र दोन तालीम हॉल
- भव्य रंगमंच, सुसज्ज मेकअप रूम
- दोन मोठे हॉल
- अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा
- लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या साऊंड सिस्टिम
- अत्याधुनिक स्टेज लाईट
- स्वयंचलित सरकारी पडदे
- मुख्य रंगमंच 15 मीटर×दहा मीटर
- प्रेक्षक गृहात 500 आणि बाल्कनीत 150 आरामदायी खुर्च्या
- संपूर्ण इमारतीला अग्निशमन यंत्रणा