Hiraman Khoskar on CM Eknath Shinde : विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) काँग्रेसची (Congress) 7 मतं फुटल्याचं चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ठाण्यातील आनंदाश्रमात भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 


हिरामण खोसकार म्हणाले की, नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील काही व्यावसायिकांची दुकाने, हॉटेल आहेत. ते हटविण्याचे काम सुरू आहे. एमएमआरडीएचा एक अधिकारी आलाय, तो जाणूनबुजून हे अतिक्रमण हटविण्याचे काम करतोय. स्थानिकांवर अन्याय केला जातोय, 350 कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, अशी माहिती त्यांनी दिली. 


हिरामण खोसकरांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक


ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवमाणूस आहे. माझे काम लगेच ऐकले. मी लोकसभा, विधानपरिषद निवडणुकीत पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. महायुतीचे काम केले नसल्याने मुख्यमंत्री नाराज झालेत, पण तरीही त्यांनी माझे काम ऐकले, असे कौतुक हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केले. 


मला उमेदवारी मिळणार, अशी अपेक्षा


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्यास वेळ झाला असता म्हणून त्यांना सांगितले नाही. दोन दिवसांपूर्वी काँगेस पक्षाची बैठक झाली. त्यात निवडणुकीला तयारीला लागण्याच्या  सर्वांना सूचना देण्यात आल्या. मला उमेदवारी मिळणार, अशी अपेक्षा आहे. मात्र, जर उमेदवारी डावलली तर स्थानिक नेते बोलतील, त्याप्रमाणे निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


हिरामण खोसकरांचा नाराजीचा सूर 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिरामण खोसकर यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त केली होती. हिरामण खोसकर यांनी म्हटलं होतं की, विधान परिषद निवडणुकीत पक्ष श्रेष्ठींनी सांगितले त्यांनाच मतदान केले आहे. माझ्यासह 7 आमदारांना मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्यासाठी सांगितले होते, त्यानुसार आम्ही मत दिले आहे. जयंत पाटील यांना ज्या 6 आमदारांनी मतदान केले त्यांचे मतं फुटले, त्यावर पक्षश्रेष्ठी का बोलत नाही? त्या 6 जणांवर कारवाई का करत नाही? असे त्यांनी यावेळी म्हटले होते. 


आणखी वाचा 


Hiraman Khoskar Meets CM Eknath Shinde : इकडं कडक कारवाईचा इशारा अन् तिकडं काँग्रेस आमदार थेट आनंद आश्रमात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!