नाशिक : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) पाठोपाठ आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळ (Dattu Bhoknal) राज्य सरकार (Maharashtra Government) विरोधात न्यायालयात (Court) याचिका दाखल करणार आहे. राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्रच्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा आरोप दत्तू भोकनळने केला आहे. 
 
काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना राज्य सरकारकडून सरकारी नोकरी (Government Job) देण्यात आली. मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी कविता राऊत यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या नियुक्तीवर कविता राऊत नाराज झाल्या. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. आता या पाठोपाठ दत्तू भोकनळही न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

  


नेमकं काय आहे कारण? 


राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या दत्तू भोकनळने 2016 च्या ऑलम्पिक मध्ये ही देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. जागतिक क्रमवारीत 13 वे स्थान पटकविणारा देशातील पहिला खेळाडू असूनही अन्याय झाल्याची भावना दत्तू भोकनळने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. राज्य सरकारकडून उत्तर महाराष्ट्राच्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा आरोपही दत्तू भोकनळने केला आहे.  2017 ला नोकरीसाठी अर्ज करुन देखील शासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा करून देखील सरकार याबाबत दखल घेत नाही. ललिता बाबरला एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय दिला जात आहे. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे दत्तू भोकनळने म्हटले आहे. दरम्यान, मागील महिन्यात 116 खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षकपदाची नोकरी देण्यात आली. त्यातही दत्तूला स्थान देण्यात आलेले नाही.


कोण आहे दत्तू भोकनळ?


दत्तू भोकनळ हा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोट्याशा गावचा आहे. त्याने नौकानयन या क्रीडाप्रकारात भारताचे नाव उज्वल केले आहे. दत्तूने 2014 मध्ये त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. त्यानंतर 2015 मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले. दत्तू भोकनळ हा 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रोइंग प्रकारात पात्र ठरलेला एकमेव भारतीय खेळाडू होता. त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोईंगमध्ये भारतासाठी अनेक पदके जिंकवून दिले आहेत. 2017 मध्ये त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. तर 2020 मध्ये दत्तू भोकनळ अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता.


आणखी वाचा 


Supriya Sule: बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंच्या पोस्टवर धावपटू कविता राऊतची खोचक टीका