नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कुस्तीपटू उत्कर्ष काळे याला सरकारी नोकरीच्या नावाखाली सरकारने त्याची शिपाई पदावर बोळवण केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यासंदर्भात एक्स या माध्यमावर पोस्ट शेअर करत भाष्य केले होते. उत्कर्ष काळे (Utkarsh Kale) याच्याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही सरकारने काही हालचाल केली नाही. महायुती सरकारने उत्कर्ष ‘डिवायएसपी’ किंवा समकक्षपदी सन्मानपूर्वक नेमणूक देण्याचा शब्द दिला होता. मात्र, हे आश्वासन पाळले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र, त्यांच्या या ट्विटवर धावपटू कविता राऊत (Kavita Raut) हिने खोचक टीका केली आहे.
बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रतील आदिवासी खेळाडू दिसले नाहीत. त्यांच्या बाजूने कधी असे ट्वीट होताना दिसले नाही. उत्कर्ष काळे मात्र महाराष्ट्रचा खेळाडू दिसतोय, त्याला शब्द दिला जातो आणि आम्हाला वेगळा निकष लावला जातो, अशा शब्दांत कविता राऊत यांनी व्यथा मांडताना दुजाभाव केला जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करत "आपले मत कळवा" असेही नमूद केले आहे. राज्य सरकारमध्ये उपजिल्हाधिकारी पदाची नोकरीची अपेक्षा असणाऱ्या कविता राऊत यांनी क्रीडा प्रशिक्षक पदावर बोळवण केल्याने न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. यावर आता सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देणार, हे बघावे लागेल.
सुप्रिया सुळेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमके काय म्हटले होते?
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील पदक विजेता खेळाडू उत्कर्ष काळे यांना महायुती सरकारने ‘डिवायएसपी’ किंवा समकक्ष पदी सन्मानपूर्वक नेमणूक देण्याचा शब्द दिला होता. परंतु वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही याबाबत बराच काळ कसलीही हालचाल शासकीय स्तरावरुन करण्यात आली नाही. प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर आता त्यांना ‘शिपाई’ या चतुर्थश्रेणीतील पदावर नियुक्ती देण्याचा आदेश शासनाने काढला आहे.
वास्तविक राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान अशा राज्यांनी अतिशय सन्मानपूर्वक सेवेमध्ये सामावून घेतले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात यापुर्वीही अनेक खेळाडूंना सन्मानपूर्वक योग्य पदांवर सामावून घेतले आहे. राज्याची क्रीडा संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी अशा प्रकारच्या नियुक्त्या आवश्यक असतात. परंतु सध्याच्या महायुती सरकारची नीतीमत्ता जाग्यावर नसल्यामुळे या सरकारने उत्कर्ष काळे यांना दिलेला शब्द न पाळून त्यांच्यावर अन्याय केला, असे खेदाने म्हणता येईल. महायुती सरकारला शब्द पाळणे जमणार नाही याची मला खात्री आहे. भविष्यात महाविकास आघाडी सरकार उत्कर्ष काळे यांना योग्य ती नियुक्ती देईल.