नाशिक : अधिक श्रावण मास सुरू असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. यात सेलिब्रिटीचाही सहभाग आहे. गुरुवारी अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी सहकुटुंब दर्शन घेतले.


नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आद्य ज्योतिर्लिंग असल्याने देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर हे नेहमी गजबजल्याचे दिसून येते. त्यातच यंदा अधिक मास आल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. पाऊस सुरू असतानाही भाविकांची रीघ सुरूच असल्याचे चित्र आहे. यात कलाकारांसह अनेक नेते, प्रसिद्ध व्यक्ती देखील त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येत असतात. गुरुवारी अभिनेत्री कंगना रनौतने त्र्यंबकेश्वर दरबारी येऊन दर्शन घेतले. तर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देखील कुटूंबियांसमवेत त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होत त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. शक्तिकांत दास यांच्या हस्ते त्र्यंबकराजाची पूजा आणि अभिषेक कऱण्यात आला. पावसाला सुरवात झाल्याने त्र्यंबकेश्वर शहरासह परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलून गेले असून देवदर्शनाबरोबरच या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भाविकांसह आणि सेलिब्रिटी त्र्यंबकेश्वरला भेटी देत आहेत. 


नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगाला अनन्यसाधारण महत्व असल्याने भाविक नेहमीच त्र्यंबकेश्वरला पसंती देतात. शिवाय नारायण नागबली सारख्या पूजा विधी शहरात होत असल्याने नेहमीच भाविकांचा राबता असतो. अशातच सध्या त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढला असून आजुबाजुंचा परिसर पर्यटनाला साजेसा तयार झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भाविकांसह पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. आज रविवार असल्याने दोन दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. भर पावसातही (Trimbakeshwer rain) नागरिक त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेत असून त्र्यंबक नगरी भाविकांनी गजबजल्याचे चित्र आहे. 


अधिक मासात भाविकांची गर्दी वाढली


दर तीन वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. येणाऱ्या भाविकांना त्र्यंबकराजाचे सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकाधिक भाविकांना दर्शनाचा लाभ होत आहे. त्याचबरोबर ब्रम्हगिरीसह अंजनेरीला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून निसर्ग सौंदर्याचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून पर्यटक त्र्यंबकेश्वर ला दाखल होत आहेत. देवदर्शनासह पर्यटन होत असल्याने अधिकाधिक नागरिकांची नाशिकला पसंती दिली जात असल्याचे गर्दीवरून दिसून येत आहे.


ही बातमी वाचा: