Nashik Viral Banner : गेल्या महिनाभरापासून टोमॅटो सर्वांच्याच तोंडचं पाणी पळवलं आहे. मात्र, शेतकऱ्यांना कधी नव्हे ते मालामाल केलं आहे. देशभरातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा झाला असून सिन्नरच्या शेतकऱ्यांनी चक्क अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

'आम्ही लखपती धुळवडकर'


नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादक शेतकरी असून देशभरातून व्यापारी वर्ग नाशिकला टोमॅटो खरेदीसाठी येत असतो. टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन हे उन्हाळ्यात घेतले जाते. मात्र, दिवाळीकडे लिलावासाठी येत असलेल्या टोमॅटोला कवडीमोल भावात विक्री होत असते. अशातच गेल्या महिनाभरापासून टोमॅटोला विक्रमी दर मिळू लागला आहे. त्यामुळे बाजारात जवळपास 200 रुपये किलो टोमॅटो दर आहे. तर 20 किलोच्या कॅरेटला 2 हजार अडीच हजार रुपयांपर्यंत भाव आहे. हाच दर साधल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. सिन्नरच्या अनेक शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सिन्नरच्या धुळवड गावात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'


सिन्नर तालुक्यातील धुळवड या गावातील असंख्य टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना यंदा टोमॅटोने मालामाल केले भाव वाढ झाली. उत्पन्न चांगलं मिळाल्याने अनेक शेतकरी कोट्यवधी झाले आहेत. त्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत असून याच पार्श्वभूमीवर बॅनर लावण्यात आले आहेत. पिकाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला टोमॅटोच्या बाजारभावातून यंदा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जवळपास 12 शेतकरी 'कोट्यधीश' तर 55 जणांनी 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर, इतर छोटे शेतकरीही 'लखपती' झाले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी लॉटरी लागल्याप्रमाणेच आपला आनंदोत्सव साजरा करत आहेत. या आनंदातून धुळवड गावात सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य  यांनी बॅनर लावला आहे. हे बॅनर सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे. 'होय आम्ही करोडपती-लखपती धुळवडकर' असा आशयाचा बॅनर लक्षवेधी ठरत आहे. 

शेतकऱ्यांच्या बॅनरची चर्चा


नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात सध्या टोमॅटो आणि टोमॅटो उत्पादकांपेक्षा टोमॅटो उत्पादकांनी लावलेल्या बॅनरची जास्त चर्चा आहे. राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी अथवा भावी उमेदवारांनी वाढदिवसाचे सण - उत्सवांचे, राजकीय पदावरील निवडीचे लावले बॅनर आपल्या कुठल्याही कोपऱ्यात दिसतात किंवा बऱ्याच वेळा एखद्या बॅनर वरील आशय लक्ष वेधून घेणारा असतो अशाच पद्धतीने नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात लावलेला बॅनर अधिक लक्षवेधी ठरत आहे. 

टोमॅटोची लाली कायम


दरम्यान, गेल्या महिनाभरापसून टोमॅटो दरात झालेली वाढ अद्यापही जैसे थे आहे. कवडीमोल भावात विकला जाणारा टोमॅटो सुरुवातीला 50 रुपये प्रति जाळीने विकला गेला. एका जाळीची (क्रेटची) क्षमता 20 किलो टोमॅटोची आहे. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो सुमारे 150 ते 200 रुपये दर मिळत आहे. एकूणच 20 किलोची एक कॅरेट सुमारे 2100-2000 रुपयांना विक्री केली जात आहे. काही शेतकऱ्यांना एकरी दहा बारा लाखांचे तर काहींना सात आठ लाखांचे उत्पन्न मिळाले.

 

संबंधित इतर बातम्या :