Ram Navami 2023: धार्मिक ऐतिहासिक, पौराणिक नागरी म्हणून नाशिकची ओळख आहे. अनेक मंदिरे असून गोदातीरी वसलेली आहेत. यातलच एक म्हणजे काळाराम मंदिर (Kalaram Temple) होय. आज रामनवमी निमित्त काळाराम मंदिर सजले असून मागील आठ दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज जाणून घेऊयात नाशिकच्या काळाराम मंदिराविषयी...


दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य असल्याचे सांगतात. त्यामुळे श्रीरामांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. याबाबतची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक. प्रसिद्ध पंचवटीतच हे मंदिर वसले आहे. नाशिक शहरात रामाची अनेक मंदिरे असून यात काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम यासह अनेक मंदिरे पाहायला मिळतात. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट्य काही वेगळेच दिसून येते. हे मंदिर इतिहासकालीन असून त्याची बांधणीही खास शैलीत आहे. 


दरम्यान, पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1783 मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.


अशी आहे काळाराम मंदिराची रचना...


संपूर्ण मंदिर 74  मीटर लांब आणि 32 मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे असून पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट असून यात चाळीस खांब असून आहे. या ठिकाणी असलेला मारूती समोरच्या  मंदिरातील श्रीरामाच्या चरणी पाहतो, असा भाव आहे. सभामंडपाच्या बाजूला तीस  फूट उंचीवर नगारखाना आहे. मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची 69 फूट आहे. कळस 32 टनी शुद्ध सोन्याचा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. मंदिराला 17 फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे. 


काय आहे मंदिराची आख्यायिका?


साधारण काही वर्षांपूर्वी या परिसरात नागपंथीय साधू वास्तव्यास होते. मंदिरालगत भैरवनाथ व गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या. त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे 1780 मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. 1790 मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी 23 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगतात. 


पंचवटी पाच वटांचा समूह


नाशिक शहरातील पंचवटी परिसर प्रचलित आहे. आख्यायिकेनुसार पंचवटी म्हणजेच श्रीरामासह सीता आणि लक्ष्मण ज्यावेळी वनवासात होते ते हे ठिकाणी. आजही या परिसरात पाच वट दिसून येतात. याच परिसरात सीता गुंफांही आहे. मंदिरापासूनच जवळच गोदावरी नदी असून प्रसिद्ध रामकुंडही तेथेच आहे. शिवाय इतर मंदिरेही याच परिसरात आहेत. 


ऐतिहासिक काळाराम मंदिर सत्याग्रह


भारतातील दलित चळवळीच्या इतिहासात या मंदिराने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2 मार्च इ. स. 1930 रोजी या मंदिरात दलितांना प्रवेश मिळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठे आंदोलन उभे राहिले होते. या सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले होते.