Nashik News नाशिक  : अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनासाठी जय्यत तयारी केली आहे. देशासह परदेशांचे लक्ष राम मंदिराच्या उद्घाटनाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) जोरदार प्रचारही केला जात आहे. 


तर रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमात शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा सद्धा चर्चेत आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी काय योगदान आहे? असे वक्तव्य केले. यावर आता विविध माध्यमातून प्रतिक्रिया येत आहेत.  नाशिकच्या साधू महंतांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


सरसकट शंकराचार्यांचा अपमान नाही


काही शंकराचार्य जाणीवपूर्वक राम जन्मभूमी बाबत वक्तव्य करत आहेत. मंदिर पूर्ण होण्याआधीच प्राणप्रतिष्ठा केली जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र तसे नाहीये,  मंदिराचे शिखरापर्यंत काम झालेले आहे. हे जर समजत नसेल तर शंकराचार्य राजकीय बोलत आहेत. राजकीय स्टेटमेंट करणाऱ्या शंकराचार्यांबाबत नारायण राणे बोलले. त्यामुळे नारायण राणे यांनी सरसकट शंकराचार्यांचा अपमान केला, असे म्हणणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी (Sudhirdas Pujari) यांनी दिली.


शंकराचार्यांचं कार्य राणेंनी समजून घ्यायला हवं


शंकराचार्यांचे सनातन हिंदू धर्मासाठीचे कार्य अतुलनीय आहे. धर्मासाठी केलेले कार्य नारायण राणे यांनी समजून घेतले पाहिजे.  नारायण राणे यांच्या शब्दाचा विपर्यास केला जात आहे. नारायण राणे हे सुद्धा हिंदू धर्माचे पाईक आहेत, अशी प्रतिक्रिया धर्म अभ्यासक महंत अनिकेत शास्त्री यांनी दिली आहे. 


शंकराचार्य काय म्हणाले होते?


स्वामी निश्चलानंद म्हणाले, 'जर कोणी या सिंहासनाशी खेळण्याचा प्रयत्न केला, तो कितीही मजबूत असला तरी तो सुरक्षित राहू शकणार नाही. मी जनतेला भडकावत नाही, पण जनता आमचा शब्द पाळते. जनमत आमच्या पाठीशी आहे, धर्मग्रंथांचे मतही आमच्या पाठीशी आहे. ऋषींचे मतही आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्ही सर्व बाबतीत बलवान आहोत आणि कोणीही आम्हाला दुर्बल समजू नये, असेही शंकराचार्यांनी सूचित केले. खऱ्या-खोट्या शंकराचार्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल हे खोटे नसतात. मग शंकराचार्यांची पदे यापेक्षा वाईट आहेत का? ते पुढे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांवर सत्ता गाजवण्याचे पद आमचे आहे.


नारायण राणे काय म्हणाले?


राम मंदिर (Ram Mandir) एवढ्या वर्षांनंतर होत आहे, याचे त्यांना कौतुक नाही. हे आतापर्यंत कोणीही करु शकले नाही. हा विषय कोणीही घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जनता पक्षाने हा विषय घेतला. मंदिर होत आहे तर शंकराचार्यांनी शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी? समाधान आहे. शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी त्यांचे योगदान काय आहे? ते सांगावे, असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. 


शंकराचार्य मोदीजींना आणि भारतीय जनता पक्षाला राजकीय दृष्ट्या पाहत आहेत. हे मंदिर राजकीय दृष्टीने होत नाही. ते धार्मिक दृष्टीने होत आहे. राम आमचा देव आहे. त्याच्यासाठी हे सर्व सुरु आहे. आम्हाला रामाचे दर्शन घेता येणार आहे. याचे आम्हाला समाधान आहे, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.  


आणखी वाचा


मोठी बातमी! जिल्हा बँकेकडून थकीत कर्जाप्रकरणी भुजबळ बंधूंना नोटीस; 'गिसाका'साठी घेतलेले कर्ज थकल्याने कारवाई