Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. तर दुसरीकडे महायुतीत नाशिक लोकसभेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु होती. अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाचे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 


अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत रखडला होता. एकीकडे खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा उमेदवारीसाठी जोर लावला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील नाशिकच्या जागेसाठी कमालीचे आग्रही होते. तर भाजपनेदेखील नाशिकच्या जागेवर दावा ठोकल्याने तिढा वाढतच चालला होता. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतरही नाशिकचा तिढा सुटत नव्हता. मात्र अखेर हेमंत गोडसेंना नाशिकमधून पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली.    


हेमंत गोडसेंना तिकीट दिल्यामुळे ओबीसी समाज नाराज


आता छगन भुजबळांना डावलून हेमंत गोडसेंना तिकीट दिल्यामुळे ओबीसी समाज (OBC Community) नाराज असल्याचे समोर येत आहे.  ओबीसी समाजाकडून नाशिकमध्ये होर्डींग्स लावण्यात आले आहेत. आम्ही 70 टक्के ओबीसी आहोत तरीही तिकीट मिळाले नाही. 'आता तरी उठ ओबीसी जागा हो!!' असा  मजकूर होर्डिंगवर लावण्यात आला आहे. मतपेटीत आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच भाजपचे दिनकर पाटील नाराज


दरम्यान, हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होताच भाजपकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत असलेले भाजपचे दिनकर पाटील (Dinkar Patil) हे गोडसे यांच्या उमेदवारीने नाराज झाले होते. हेमंत गोडसे यांच्याबद्दल मतदारसंघात मोठी नाराजी आहे. भाजपच्या नेत्यांनी आपल्याला तयारी करायला सांगितले होते. गोडसे हे गेल्या पाच वर्षात मतदारांना भेटले नव्हते, त्यामुळे आपण यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेऊन भूमिका जाहीर करणार असे त्यांनी म्हटले होते. 


नाशिकची निवडणूक ठरणार लक्षवेधी 


तर आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje), वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर (Karan Gaikar) निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी बंडखोरी केली असून त्यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराजही (Shantigiri Maharaj) ठाम असून ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.  तसेच भाजपकडून मला उमेदवारी मिळणार असा दावा केलेले महंत अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) यांनी हेमंत गोडसेंना पाठींबा दिला आहे. त्यामुळे आता नाशिक लोकसभेची निवडणूक (Nashik Lok Sabha Election) लक्षवेधी ठरणार असून यात नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha : गोडसेंवर नाराज असलेले महायुतीतील नेते तुम्हाला मदत करणार का? राजाभाऊ वाजेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले...