Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक गंभीर आरोप केला आहे. नाशिकच्या चांदवड येथे राष्ट्रीय महामार्गावर हिरवी चादर टाकून मजार बांधली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही मजार काढून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही त्याच्या बाजूला हनुमानाचे मंदिर उभारू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 


नितेश राणे म्हणाले की, नाशिकच्या चांदवड येथे राष्ट्रीय महामार्गावर हिरवी चादर टाकून तिथे मजार बांधली जात आहे. या मजारीसाठी मालेगाव येथून मौलानाला बोलावण्यात आले. त्याला  साळुंखे नावाच्या अधिकाऱ्याने २० हजार रूपये दिले, असा आरोप करत आम्ही नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांना सांगणार आहोत की, ही मजार काढून साळुंखेवर कारवाई करा. नाही तर आम्ही बाजूला हनुमानाचे मंदिर बांधू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 


नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल 


आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. गेल्या अधिवेशनात दाऊदचा जवळचा हस्तक सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीचा व्हिडिओ आम्ही सरकारसमोर आणला होता. सलीम कुत्ता हा पेरोलवर बाहेर होता. पेरोलवर असताना तो सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करताना आपल्याला दिसून आला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे सिद्ध झालेले आहे की, सलीम कुत्तासोबत बडगुजरच आहे. बडगुजर हा महत्वाचा विषय नाही. पण बडगुजरचा गॉडफादर कोण? बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लाऊन नाशिकमध्ये फिरतो? बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो? तर संजय राऊतची.


संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवावा


बडगुजरची चौकशी करत असताना संजय राऊत जो याचा गॉडफादर आहे, त्यामुळे संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे.  1993 च्या बॉम्बस्फोटात ज्या दाऊदचा हात होता . त्याचा हस्तक सलीम कुत्तासोबत यांचे संबंध आता सिद्ध झाले आहेत. गुन्हा दाखल झाला आहे. यावरून स्पष्ट होत आहे की, संजय राऊत हा देशद्रोही आहे, असे नितेश राणे म्हणाले. 


रत्नागिरी सिंधुदुर्गला लागलेला विनायक राऊत हा शाप घालवायचाय


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांकडून या मतदारसंघावर दावेदारी सुरु आहे. आज मंत्री उदय सामंत यांनीदेखील रात्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा केला आहे. याबाबत नितेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, दावे प्रतिदावे करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. महायुती म्हणून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. महायुतीचा कुठलाही उमेदवार येऊ दे, आम्ही निवडून आणू. फक्त रत्नागिरी सिंधुदुर्गला लागलेला विनायक राऊत हा शाप आम्हाला घालवायचा आहे. निर्णय आमचे वरिष्ठ घेतील, असे त्यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा


रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा कुणाची? दावा दोघांचाही, पण भाजपसोबत शिवसेनेनेही पत्ते लपवले