Malegaon : मालेगाव 2008 बॉम्बस्फोट (Malegaon Bomb Blast Case) प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने (NIA Court) आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी (Sudhakar Dwivedi) उर्फ दयानंद पांडे याच्या विरोधात 10 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पुढील सुनावणीत हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. 


मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सुधाकर द्विवेदीविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टानं नुकतंच या प्रकरणात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांच्याविरोधातही जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. 


10 हजार रुपयांचं जामीनपात्र वॉरंट जारी


सुनावणीच्यावेळी सुधाकर द्विवेदीही न्यायालयात सातत्यानं गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. सुधाकर द्विवेदी विरोधात 10 हजार रुपयांचं जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. पुढील सुनावणीत हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. 


20 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश


मालेगाव बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर तसेच इतर आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयाने सोमवारी कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला होता. मात्र प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात हजर राहिल्या नाही. त्याऐवजी ठाकूर यांच्या वकिलाने प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याचे सांगत सूट देण्याची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी मात्र हा अर्ज फेटाळत प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने एनआयएला 20 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.


नेमकं काय आहे प्रकरण?


मालेगावमधील एका मशिदीच्या आवारात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण जखमीदेखील झाले होते. या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी आणि अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली होती. याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) या प्रकरणाचा तपास करत होतं. मात्र, नंतर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या