National Youth Festival नाशिक : राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival) आयोजन यंदा नाशिकला करण्यात आले आहे. केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात युवाग्राम मैदान, हनुमान नगर (Yuvagram Maidan Hanuman Nagar) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा महोत्सवानिमित्त देशभरातील युवा प्रतिनिधी नाशिकमध्ये आलेले आहेत. विविध राज्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे स्टॉल मांडण्यात आले आहेत. याठिकाणी नाशिकच्या मिसळसह विविध राज्यातील खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी नाशिककरांची झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे.
खवय्यांसाठी पर्वणी
विविध राज्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे स्टॉल याठिकाणी मांडण्यात आल्याने नाशिककर खवय्यांसाठी ती जणू पर्वणीच ठरली आहे. या पदार्थांची चव घेऊन तृप्तीचा ढेकर देत नाशिककर महोत्सवातील विविध कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद घेताना दिसत आहेत.
विविध राज्यातील खाद्यपदार्थांची नाशिककरांना ओळख
जम्मू काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंत आणि गुजरात ते उत्तर पूर्व राज्यातील विविध खाद्य पदार्थांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर आपोआप नाशिककर या स्टॉल्सकडे वळत होते. येथील लज्जतदार पदार्थांची ही चव नाशिककरांच्या जिभेवर दीर्घकाळ रेंगाळणार आहे. यानिमित्त विविध राज्यातील खाद्य पदार्थांची ओळख नाशिककरांना होत आहे.
राज्यातील पहिल्या क्रीडा दिनाला सुरुवात
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन (15 जानेवारी) हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी राष्ट्रीय युवा महोत्सवात राज्यातील पहिला क्रीडा दिन साजरा करण्यात आला. तसेच या दिनाच्या पार्श्वभूमीवर काही खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला.
या खेळांडूचा झाला सन्मान
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेती धावपटू कविता राऊत, टेबल टेनिसपटू नरेंद्र छाजेड, हँडबॉलपटू साहेबराव पाटील, तलवारबाजी पटू अशोक दुधारे, अजिंक्य दुधारे, अस्मिता दुधारे, राजू शिंदे, व्हॉलीबॉल पटू आनंद खरे, अविनाश खैरनार, रोइंगपटू अंबादास तांबे, वैशाली तांबे, दत्तू भोकनाळ, कुस्तीपटू गोरख बलकवडे, पॅरा एशियन सुवर्णपदक प्राप्त खेळाडू दिलीप गावित, योग अभ्यासात गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या प्रज्ञा पाटील आदी पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
आणखी वाचा