National Youth Festival : 15 युवकांसह दोन संस्थांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान; महाराष्ट्राला तीन पुरस्कार, नाशिकच्या 'या' संस्थेचा गौरव
Nashik News : राष्ट्रीय युवा महोत्सवात सोमवारी १५ युवकांसह दोन संस्थांना राष्टीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्राला तीन पुरस्कार मिळाले असून नाशिकच्या एका संस्थेचा समावेश आहे.
National Youth Festival नाशिक : 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव (National Youth Festival) सध्या नाशिकला (Nashik) पार पडत आहे. या अंतर्गत सोमवारी केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा विभागामार्फत देशसेवा तसेच समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांना तसेच स्वयंसेवी संस्थांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय युवा पुरस्काराने’ (National Youth Award) सन्मानित करण्यात आले. महायुवाग्राम, हनुमाननगर येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला युवा मंत्रालय संचालिका विनिता सूद, अवर सचिव धर्मेंद्र यादव, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास धिवसे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अर्जुन पुरस्कार विजेती धावपटू कविता राऊत यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील खेळाडू उपस्थित होते.
भारताची ओळख ‘युवकांचा देश’
यावेळी निसिथ प्रामाणिक म्हणाले की, संपूर्ण जगामध्ये भारत देशाची ओळख ही ‘युवकांचा देश’ म्हणून आहे. आज आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात विकासाचे पाऊल पुढे टाकले आहे. विकासाच्या दृष्टीने देशात आमूलाग्र बदल घडून येत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा प्रभाव निर्माण झाला आहे. तसेच राष्ट्रनिर्माण आणि देशाला पुढे घेऊन जाण्यात युवकांचे मोलाचे योगदान आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
युवकांचे मी आभार मानतो - निसिथ प्रामाणिक
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युवकांप्रती अतिशय प्रेम आहे. युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना सन्मानित करण्याची कल्पना देखील त्यांनीच मांडली होती. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच युवकांना प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले आहे. देशाच्याप्रती सेवाभाव असणाऱ्या आणि समाजसेवेसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या 15 युवक आणि दोन संस्थांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. देश सेवा आणि सामाजिक क्षेत्रात अमुलाग्र काम करणाऱ्या युवकांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
या युवकांचा झाला सन्मान (2020-2021)
- अधि दैव (17), गुरुग्राम, हरियाणा
- अंकित सिंह (29), छत्तरपूर, मध्य प्रदेश
- बिसाठी भरत (28), अनंतपुरम, आंध्र प्रदेश
- केवल किशोरभाई पावरा (27) बोटाद, गुजरात
- पल्लवी ठाकूर (26), पठाणकोट, पंजाब
- प्रभात फोगाट (25), झज्जर, हरियाणा
- राम बाबू शर्मा (28), जयपूर, राजस्थान
- रोहित कुमार (29), चंडीगड
- साक्षी आनंद (26), पाटणा, बिहार
- सम्राट बसाक (28), धलाई, त्रिपुरा
- सत्यदेव आर्य (30), बरेली, उत्तर प्रदेश
- वैष्णवी श्याम गोतमारे (26), अकोला, महाराष्ट्र
- विधी सुभाष पलसापुरे (26), लातूर, महाराष्ट्र
- विनीशा उमाशंकर (17), तिरुवन्नामलाई, तमिळनाडू
- विवेक परिहार, उधमपूर, जम्मू-कश्मीर
स्वयंसेवी संस्थांचा सन्मान (2020-2021)
- शक्ती विकास बहुद्देशीय संस्था, नाशिक, महाराष्ट्र
- युनिफाईड रूरल डेव्हलपमेंट ऑर्गेनायझेशन, थौबल, मणिपूर
असे आहे पुरस्काराचे स्वरुप
राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त युवकांना वैयक्तिक पुरस्कारात एक लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच युवक संस्थांमध्ये तीन लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
आणखी वाचा