नाशिक : शिक्षण (Education) हे वाघिणीचे दूध समजले आहे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. शिक्षण आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे. गोरगरीब नागरिकांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) माध्यमातून सरकारकडून सरकारी शाळा उपलब्ध आहेत. मात्र सध्याच्या आधुनिक काळात शिक्षणाच्या खाजगीकरणात मोठी वाढ झाली आहे. स्पर्धेच्या युगात सरकारी शाळा टिकवणे हे आता मोठे आव्हान होत आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची (ZP School) अवस्था अतिशय बिकट असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाडगाव या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या करवंदेवाडी आणि वाडगाव या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील शिक्षण विभागाची जबाबदारी आता नाशिकवर आहे अर्थात शिक्षण खाते दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे आहे. त्यामुळे सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याचे मोठे आव्हान दादा भुसे यांच्यावर आहे. मागील अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील सरकारी शाळा डिजिटल झाल्याचे बोलले गेले. मात्र नाशिक शहरालगत असलेल्या वाडगाव येथील शाळांची भीषण परिस्थिती समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील शाळांची आकडेवारी
- जिल्हा परिषद - 3261
- महनगरपालिका - 183
- नगर पालिका - 23
- अनुदानित शाळा - 1275
- खाजगी शाळा - 840
- एकूण - 5582 शाळा आहेत
- 9 लाख 13 हजार 789 विद्यार्थी.
जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण
नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या वाडगाव येथील जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाली आहे. मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रोजेक्टर आहे. मात्र, इंटरनेट व्यवस्था नाही. शाळेच्या भिंती तर कधीही कोसळतील अशी परिस्थिती आहे. त्यातच लहान मुले जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे घेत आहेत. या शाळेला इमारत मिळावी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळे साहित्य मिळावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. या शाळेतील मुख्याध्यापकांनी गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती असली तरी देखील आम्ही कोणतीही अडचण लक्षात न घेता मुलांना घडवण्याचं काम करत असल्याचं प्रामाणिक मत व्यक्त केले आहे.
काटेरी कुंपणाने शाळेला तटबंदी
तर करवंदेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला सुरक्षा भिंतच नसल्याचे दिसून आले आहे. काटेरी कुंपणाने या शाळेला तटबंदी केल्याचे पाहायला मिळाले. या शाळेच्या भिंतीला लागूनच शेती आहे आणि या ठिकाणी बिबट्याचा देखील वावर असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून शाळेत मुलांना पाठवले तर काही अनुचित प्रकार होऊ नये, अशी भीती देखील व्यक्त होत आहे.
दादा भुसे काय उपाययोजना करणार?
दरम्यान, ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांचे मुलं या सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतात. खरंतर सरकारी शाळा स्पर्धेच्या युगात टिकून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असले तरी मुलं विविध ठिकाणी शाळेचे नाव उंचावत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना इतर शहरी मुलांप्रमाणेच स्वच्छ आणि सुंदर शाळा मिळेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आता नाशिकवर आहे. त्यामुळे आता नव्याने शालेय शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारलेल्या दादा भुसे यांना येत्या काळात सरकारी शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी स्वतःच्याच जिल्ह्यातून सुरुवात करावी लागेल हे मात्र तितकेच खरे. शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी दादा भुसे काय उपाययोजना करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा