Nashik News : नाशिकच्या वडाळ नाका (Wadala Naka) भागात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकीस्वाराचा नायलॉन मांजाने (Nylon Manja) गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहे. मुशरन मोहसीन सय्यद असं जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुशरन सय्यद हे मेनरोड (Main Road) येथील कापड दुकानात कामाला आहेत. मुसरन हे सायंकाळी दुचाकीवरून वडाळा नाका परिसरात जात असताना त्यांच्या गळ्याला नायलॉन अडकला. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. त्याच अवस्थेत नागरिकांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
नायलॉन मांजा हद्दपार करा
डॉक्टरांनी सय्यद यांच्यावर तात्काळ उपचार करत जखमेवर 40 टाके घातल्याने त्यांचा जीव वाचल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलिसांकडून नायलॉन माझ्या विरोधात सुरू असलेली कारवाई तुडकी पडत असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर या नायलॉन मांजावर लवकरात लवकर बंदी घालून नायलॉन मांजा हद्दपार करा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
75 संशयितांवर तडीपारीची कारवाई
दरम्यान, नायलॉन मांजामुळे होणारे अपघात लक्षात घेत नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आयुक्तालय हद्दीत 75 नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुध्द प्रथमच हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते. मकरसंक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी होत असून शहरात मागील काही दिवसांपासून पतंगबाजी सुरू झाली आहे. ती वाढल्यावर नायलॉन व तत्सम मांजामुळे होणारी जीवितहानी अथवा गंभीर दुखापत रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार विविध पोलीस ठाणे, गुन्हेशाखा पथकांनी केलेल्या धडक कारवाईत 34 गुन्हे दाखल करुन 39 जणांना अटक केली आहे. तर मांजा खरेदी व विक्रीसह तो वापरात आणणाऱ्या जवळपास 75 संशयितांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या