Nashik Weather Update नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेला निफाड (Niphad) तालुका सध्या कडाक्याच्या थंडीने चांगलाच गारठला आहे. गेल्या काही दिवसांपासून निफाडसह नाशिकमध्ये तापमानात प्रचंड घट झाल्याचे चित्र आहे. गुरुवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली आहे. गुरुवारी निफाडचे तापमान 4.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. आज शुक्रवारी निफाड तालुक्यात 4.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे...


आज शुक्रवारी नाशिकचे (Nashik) तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. गुरुवारी नाशिकचा पारा ८.६ अंशांपर्यंत खाली आला होता. नाशिकमध्ये यंदा मकर संक्रांत झाल्यानंतर थंडीला (Winter) सुरुवात झाली आहे. दरवर्षी मकर संक्रांत झाली की हळूहळू थंडी कमी होत आहे. 


द्राक्ष उत्पादक धास्तावले


यंदा उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. पाऱ्यातील घसरणीमुळे निफाडकरांना अशरक्षः हुडहुडी भरली आहे. थंडीच्या लाटेमुळे द्राक्षपंढरीची गारठली असून द्राक्ष (Grapes) उत्पादक धास्तावले आहेत. तसेच नाशिककरही चांगलेच गारठले आहेत. सकाळी नागरिक घराबाहेर पडताना उबदार कपडे परिधान करूनच बाहेर पडत आहेत. 


द्राक्षबाग वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड


निफाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमणी फुटण्याची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांनी द्राक्षबागेत शेकोट्या पेटविल्या आहेत, तर काहींनी द्राक्षांना कापड गुंडाळले आहेत. शेतकरी द्राक्षबाग वाचविण्यासाठी शक्य त्या पद्धतीने धडपड करताना दिसून येत आहेत. त्यामुळे थंडीच्या कडाक्यात शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.


नाशिकचा पारा सात अंशाच्या खाली येण्याची शक्यता


पहाटे पडणाऱ्या दवबिंदूंमुळे द्राक्षबागांना धोका वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. संपूर्ण हंगामात कडाक्याच्या थंडीपासून दुरावलेल्या नाशिककरांना अखेरच्या टप्प्यात थंडीची अनुभूती मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात घट होत असून, नाशिकमध्ये थंडीची लाट आल्याची स्थिती आहे. दरम्यान, पुढील १५ दिवसांत नाशिकचा पारा सात अंश सेल्सिअसच्या खाली घसरेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.


उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा नाशिकवर प्रभाव


उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव नाशिकच्या वातावरणावर पडतो. उत्तरेकडे बर्फवृष्टी आणि तीव्र थंडी असतानाही पश्चिम भागातील स्थितीमुळे वाऱ्यांना अवरोध निर्माण झाला होता. अल निनोचाही प्रभाव आहे. यामुळे नाशिकमध्ये नेहमीप्रमाणे थंडी जाणवली नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. मात्र, अखेरच्या चरणात स्थिती बदलल्याने ही कसर भरून निघाली असून, दोन दिवसांपासून सर्वत्र कमालीचा गारठा पसरला आहे, असे प्रा. किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे.


आणखी वाचा 


Nashik Crime News : नाशिकमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चोरी, घरफोड्या रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान