Nashik Crime News नाशिक : शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकत्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तीन चोरीच्या व एक घरफोडीची (Robbery) घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे ३ लाख ८७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. चोरी आणि घरफोडी रोखण्याचे नाशिक पोलिसांसमोर (Nashik Police) मोठे आव्हान आहे. 


गंगापूर रोडवरील (Gangapur Road) सावरकर नगर परिसरात घरफोडीची घटना घडली आहे. ठक्कर बाजार बसस्थानकावर (Thakkar Bazar Bus Stand) महिलेच्या पिशवीतील सोने चांदीचे दागिने लंपास केले आहेत. पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरातून लॅपटॉपसह बॅगची चोरी झाली आहे. तर अंबडमधून (Ambad) सोन्याचे दागिने व रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. 


41 हजारांचा मुद्देमाल लंपास


बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाईल व रोकड असा ४१ हजारांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केली. प्रशांत पाटील (रा. विश्वनाथ पार्क, सावरकरनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, रात्री घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महिलेच्या पिशवीतील सोने चांदीचे दागिने चोरीला


ठक्कर बाजार बसस्थानक येथे गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पिशवीतील 1 लाख 16 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. प्रविणकुमार पिळोदेकर हे पत्नीसह ठक्कर बाजार बसस्थानक येथे आले होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या पिशवीत मंगळसूत्र व दागिने असा 1 लाख 16 हजार 904 रुपयांचे दागिने असलेली डबी चोरून नेली. प्रविणकुमार काशिनाथ पिळोदेकर (रा. कर्मयोगीनगर) यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लॅपटॉपसह बॅगवर चोरांचा डल्ला


पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या दत्त मंदिर आवारातून एकाची लॅपटॉपसह बॅग असा 35 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. बॅगमध्ये लॅपटॉप, हार्डडीक्स, मोबाईल असे साहित्य होते. ओमकार भिमराव कातकाडे (रा. पाथर्डीफाटा) यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोन्याचे दागिने व रोकड लंपास


अंबडच्या दत्तनगर परिसरातील घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोकड असा १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. अवधूत रामकृष्ण धांडे (रा. अथर्व अपार्टमेंट, दत्तनगर, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आणखी वाचा


Nashik Terror Funding : सिरियातील महिलेशी संबंध, इसिसला फंडिंग, नाशिकमध्ये उच्चशिक्षित तरुण ATS च्या हाती, अनेक धक्कादायक खुलासे समोर