Nashik News नाशिक : यंदा नाशिक जिल्ह्यात पाऊस (Rain) कमी पडल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच 437 गावे आणि वाड्यांना आताच 136 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. यंदा अल निनोमुळे (El Nino) सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. तसेच जायकवाडीला नाशिकच्या (Nashik) धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी खालावली आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने जायकवाडी धरणासाठी (Jayakwadi Dam) गंगापूर आणि दारणा समूहात जवळपास 2740 दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडावे लागले. यामुळे आता नाशिक जिल्ह्यावर पाणी टंचाई आणि प्रसंगी दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे अल निनोचे वर्ष असल्याने पर्जन्यमान यंदाही विलंबाने होण्याची शक्यता गृहीत धरुन पाणी नियोजन करावे लागणार आहे.
निम्म्या जिल्ह्यात गंभीर टंचाईची शक्यता
जिल्ह्यातील 15 पैकी 8 तालुक्यांत म्हणजे निम्म्या जिल्ह्यात गंभीर टंचाईची शक्यता आहे. आगामी काळात तालुक्यांचीही संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नांदगाव तालुक्यातील 199 गावे आणि वाड्यांना तब्बल 35 टँकरद्वारे दररोजच्या 89 फेऱ्यांतून तहान भागविली जात आहे. बागलाणमध्ये 18, चांदवडला 19, देवळ्यात 14, मालेगावमध्ये 18 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.
येवल्यात भीषण पाणी टंचाई
येवलयात सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात 35 टँकरद्वारे 44 गावे आणि 15 वाडे-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबरपासूनच अनेक गावांतील जलस्रोत कोरडे झाल्याने पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची संख्या वाढू लागली आहे. शहराच्या साठवण तलावाच्या भरवशावरच गावोगावी सुरु असलेल्या टँकरमध्ये पाणी भरले जाते. त्यामुळे पालखेडच्या पाणी आवर्तनावरच सर्वकाही अवलंबून असते. सध्या 44 गावे आणि 15 वाड्या-वस्त्यांवर दररोज 59 खेपांतून साडेसहा लाख लिटर पाणी 35 खासगी टँकर्समधून पुरवले जात आहे. सरासरी 14 हजार लिटर पाणी एका खेपेला असे 5 लाख लिटरपेक्षा जास्तीचे पाणी रोज येवलेकरांची तहान भागवत आहे. त्यावरच जनावरांचीदेखील गरज भागवली जात आहे.
या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा
सध्या आहेरवाडी, जायदरे, रेंडाळे, चांदगाव, ममदापूर, खरवंडी, देवदरी, वसंतनगर, अनकाई, गोरखनगर, सायगाव, नगरसूल, लहित, हडपसावरगाव, पांजरवाडी, पिंपळखुटे बुद्रुक व खुर्द, भूलेगाव, कासारखेडे, कोळगाव, वाईबोथी, कोळम खुर्द, कोळम बुद्रुक, आड, सुरेगाव, गारखेडे, सोमठाण जोश, रहाडी, वाघाळे, खामगाव, देवठाण, नायगव्हाण पन्हाळसाठे, धनकवाडी, धामणगाव, वडगाव, खामगाव, देवळाणे, पुरनगाव, सातारे, दुगलगाव, देशमाने, कुसूर, डोंगरगाव, बोकटे आदी 44 गावे तसेच ममदापूर, अंकाई, गोरखनगर, सायगाव, नगरसूल, पिपलखुटे बु., राजापूर, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द आदी गावांमधील 15 वाड्या वस्त्या पाणी पुरवठा केला जात आहे.
आणखी वाचा