Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात दिवसेंदिवस चुरस वाढत चालली आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तिढा सुटलेला असताना दुसरीकडे मात्र नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये (Mahayuti) अजूनही बिघाडी असल्याचे दिसून येत आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अलीकडेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत किशोर दराडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, असा निश्चय ठरला होता. मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांच्या प्रचारासाठी बैठकांचा जोर वाढला आहे. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण (Suraj Chavan) हे  मैदानात उतरले आहेत. महेंद्र भावसार यांचा प्रचार आणि नियोजनासाठी सुरज चव्हाण यांनी नाशिकमध्ये बैठक घेतली. महेंद्र भावसार हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत, असे स्पष्टीकरण सुरज चव्हाण यांनी दिले आहे. 


मविआच्या नेत्यांकडून आमच्या उमेदवाराला संपर्काचा प्रयत्न


राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून आम्ही महेंद्र भावसार यांची उमेदवारी जाहीर केली ते आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत. आम्ही दोस्तीत कुस्ती न करता मैत्रीपूर्ण लढत लढतोय. महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून आमच्या उमेदवाराला संपर्क करण्याचा प्रयत्न झाला, असा गौप्यस्फोटही सुरज चव्हाण यांनी यावेळी केला आहे.  


सुरज चव्हाणांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना 


नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील शिक्षक या निवडणुकीत मतदार असून 5 जिल्ह्यातील विधानसभा, गट-गण, तालुका व विभाग अध्यक्षांनी आपापल्या परिसरातील शिक्षक आपल्या उमेदवाराला कसे मतदान करतील व आपण निवडणुकीत कशी काळजी बाळगावी याचे सविस्तर विश्लेषण करत निवडणुकीची रूपरेषा सुरज चव्हाण यांनी आखून दिली. २६ जून मतदानाची तारीख असून यावेळी आपण काय विशेष काळजी घ्यावी याच्या सूचना यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. 


नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाशिकच्या जागेसाठी चौरंगी लढत होणार असून या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा 


'डमी उमेदवार उभा करणे, आरोप करणे, हा त्यांचा जुनाच छंद'; किशोर दराडेंचा विवेक कोल्हेंवर पलटवार