Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या शैक्षणिक संस्थांवर सरकारी यंत्रणेने कारवाई केली. मात्र या कारवाईत काहीच निष्पन्न न झाल्याने नाशिक शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदारांवर असणाऱ्या गुन्ह्यांबाबत आणि इतर प्रलंबित प्रकरणांबाबत तितक्याच तत्परतेने चौकशी करावी, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली होती. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी विवेक कोल्हेंवर जोरदार पलटवार केला आहे. 


किशोर दराडे यांनी अहमदनगर (Ahmednagar) येथे पत्रकार परिषद घेतली. राज्यातील शिक्षकांना 12-12 वर्ष पगार नव्हता. मी 1 हजार 160 कोटी रुपये शिक्षकांना मिळवून दिले. राज्यात 19 वर्षांपासून प्रलंबित असलेला सर्वात मोठा जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न मी आमदार झाल्यावर पटलावर आला. त्यामुळे शिक्षक माझ्या बाजूने राहतील, असा विश्वास किशोर दराडे यांनी व्यक्त केला.


किशोर दराडेंचा विवेक कोल्हेंवर पलटवार


विरोधकांकडून माझ्यावर फसवणूक, पैशांचे गैरव्यवहार आणि अपहरण केल्याचा खोटा आरोप केला जातोय. हे सर्व आरोप खोटे असून मुळात ही निवडणूक काही कारखान्याची निवडणूक नाही. त्यांच्याकडूनच डमी उमेदवार उभा करणे, आरोप करणे, हा त्यांचा जुनाच छंद आहे असं म्हणत नाव न घेता दराडे यांनी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्याकडे शिक्षकांसाठी काय काम केले हे सांगण्यासाठीच नाही. म्हणून माझ्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे दराडे यांनी म्हटले आहे.


टीडीएकचे उमेदवार भाऊसाहेब कचरेंचा विवेक कोल्हेंवर निशाणा


संदीप गुळवे यांचा इगतपुरी मतदारसंघ हा राखीव असल्याने त्यांना तेथून आमदार होता येत नाहीये, किशोर दराडे यांचे पुतणे कुणाल दराडे हे येवला मतदारसंघातून इच्छुक आहेत. म्हणून किशोर दराडे हे शिक्षक मतदारसंघातून आमदार होण्यासाठी उमेदवारी करत आहेत. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या मातोश्री या भविष्यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असल्याने विवेक कोल्हे यांनी शिक्षक मतदारसंघाची निवड केल्याचे टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांनी म्हटले आहे. त्यातच विवेक कोल्हे यांनी आता तिशी ओलांडली आहे. त्यामुळे त्यांना शिक्षकांचे प्रश्न कसे माहिती असणार असा सवाल करत, शिक्षकांशी निगडित प्रश्न हे संस्था चालक आणि सरकारशी संबंधित असतात. मग संस्था चालकच जर शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करणार असतील तर ते संस्थांच्या विरोधात जाऊन शिक्षकांचे प्रश्न कसे सोडवतील आणि जे पक्षाचे उमेदवार आहेत ते सरकारच्या विरोधात शिक्षकांच्या बाजूने कसे उभे राहतील, असा सवाल कचरे यांनी उपस्थित केलाय. 


आणखी वाचा


Nashik Teachers Constituency Election 2024 : 'काळ कसोटीचा, पण आमचा वारसा संघर्षाचा'; धाडसत्रानंतर विवेक कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया