नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार घडला. आता या प्रकरणी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. सुरक्षारक्षकांनी मारहाण केली असेल तर सर्वात पहिले कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नाशिक येथील महेंद्र सूर्यवंशी आणि त्यांचे आई-वडिलांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर जाण्याची घाई केली. त्यावेळी महेंद्र यांची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी भाविकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे.
दोषींवर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, काल नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाला त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेताना धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याच्या प्रकरणावर आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी वेळेत दर्शन होईल आणि योग्य त्या सुविधा प्रशासन आणि मंदिर प्रशासनाकडून मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली.
मंदिराच्या विश्वस्तांचे स्पष्टीकरण
या प्रकाराबाबत मंदिर समितीच्या विश्वस्तांकडून खुलासा करण्यात आला आहे . सलग सुट्ट्या असल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गर्दी जास्त असल्याने सुरक्षारक्षकांनी संबंधित भाविकांना पुढे जाण्यास सांगितले. मात्र संबंधित भाविकांनी चार धामचे तीर्थ चढवण्यासाठी आग्रह धरला. एक वयोवृद्ध महिलेचे पाय अडकून ती खाली पडली. याच आग्रहामुळे वाद झाला, आम्ही या प्रकरणी चौकशी करत आहोत, चौकशी करून कारवाई करू, असे स्पष्टीकरण मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासना समवेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर ट्रस्टला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या