Nashik Shivsena : नाशिकमधील शिवसेनेच्या (Shisvena) महिला पदाधिकाऱ्यांमध्ये (Women Leaders) तुफान राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत पदे वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना दोन महिलांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर हा वाद थेट पोलिसात गेला. त्यानंतर पोलीस ठाण्यातही खडाजंगी पाहायला मिळाली. सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नाशिकच्या दोन महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याचे चित्र दिसले.


शिवसेना शिंदे गटाचे राज्य सचिव भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhari) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते त्यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी पदे वाटपाचा कार्यक्रम होता यास सुमारास नाशिक मधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि याच नियुक्तीच्या कार्यक्रमात नियुक्तीवरून दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर पदाधिकारी लक्ष्मी ताठे आणि शोभा मगर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मुंबई नाका पोलीस (Mumbai Naka Police) ठाणे गाठले. मात्र या ठिकाणी शोभा मगर यांचाही एक गट पोहचल्याने दोन्ही गटात पोलीस ठाण्यातच बाचाबाची झाली.


शिवसेना शिंदे गटाच्या नाशिकच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याची घटना घडली. शिवसेनेचे राज्य सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांडक सर्कल येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. यावेळी महिला पदाधिकारी शोभा मगर आणि लक्ष्मी ताठे या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये पद वाटप करण्यावरून शाब्दिक बाचाबाची होऊन, शोभा मगर यांनी लक्ष्मी ताठे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर लक्ष्मी ताठे या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्या असता इथंही वाद सुरू झाला. शेवटी पोलिसांसह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. 


विनयभंग केल्याचा आरोप 


मात्र शोभा मगर आणि त्यांचा मुलगा धीरज मगर यांनी पोलीस स्टेशनमध्येच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच धीरज मगर यांनी विनयभंग केल्याचा आरोपही लक्ष्मी ताठे यांनी केला आहे. या प्रकरणी ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ताठे यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी शोभा मगर यांनी आपल्याला तक्रार बाबत कुठलीही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच ही घटना पक्ष नेत्यांसमोर घडली. त्यामुळे मी काय बोलले, हे सगळ्यांना माहीत आहे, असे स्पष्टीकरण शोभा मगर यांनी दिले.


पक्ष वाढीसाठी घातक.... 


दरम्यान लक्ष्मी ताठे यांनी मुंबई पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे तर शोभा मगर यांनी हे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत एका बाजूला भाऊसाहेब चौधरी शिवसेना शिंदे गटाच्या संघटन मजबुतीसाठी नाशिक शहरात दाखल असताना अशा पद्धतीने पक्षातच राडा होत असल्याचं समोर आला आहे त्याचबरोबर पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण हमरी तुम्ही पर्यंत जाणे, हे पक्ष वाढीसाठी घातक असल्याचे बोलले जात आहे.