Nashik AnnaSaheb More : विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड घालून कार्य केल्यास विश्वामध्ये शांती व ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी सर्वानी एकजूट होउन कार्य केले पाहिजे. “माणुसकी नावाचा एकच धर्म व माणूस नावाची एकच जात” असा संदेश आण्णासाहेब मोरे (Annasaheb More) यांनी उपस्थितांना दिला. निमित्त होते, नाशिकच्या (Nashik) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने नेपाळमध्ये रुद्राक्ष लिंगार्चन सोहळ्याचे. 


अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाच्या (Swami Samarth Gurupith) वतीने भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळ्याचे आयोजन नेपाळ (Nepal) येथील श्री क्षेत्र पशुपतीनाथ, काठमांडू येथे करण्यात आले होते. यावेळी रुद्राक्ष लिंगार्चन व श्री ललिता सहस्रनाम पठण सोहळा पार पडला. यावेळी हजारो जनसमुदायाला अण्णासाहेब मोरे यांनी संबोधित केले. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला अण्णासाहेब मोरे आणि सेवामार्गाचे देशविदेश अभियान प्रमुख नितीन मोरे हे नेपाळमध्ये पोहोचले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेपाळमध्ये भव्य लिंगार्चन सोहळा उत्साहात पार पडला. नेपाळमध्ये प्रथमच होत असलेल्या अशा या अभूतपूर्व ऐतिहासिक-आध्यात्मिक आंतरराष्ट्रीय सत्संगासाठी नेपाळचे उपराष्ट्रपती रामसहाय प्रसाद यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


नेपाळ येथील गोदावरी सेवा केंद्राच्या स्थानिक महिला-पुरुष मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने अण्णासाहेब मोरे यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर तीर्थ येथील गंगापूजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी भारत आणि नेपाळमधून हजारो सेवेकरी शुक्रवारीच आणि पंचक्रोशीतील विविध धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. लिंगार्चन कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा सर्वांनी मनमुराद आनंद घेण्याचे आणि सोहळा अविस्मरणीय करण्याचे आवाहन स्वामी समर्थ केंद्राकडून करण्यात आले होते. 


असा पार पडला लिंगार्चन सोहळा


आज सकाळी 8 ला भूपाळी, आरतीने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर 8.30 ते 10.30 पर्यंत मुख्य लिंगार्चन आणि ललिता सहस्रनाम पठणाचा कार्यक्रम पार पडला. 10.30 वाजता व्यासपीठावर आण्णासाहेब मोरे यांचे आगमन झाल्यानंतर मान्यवर दीपप्रज्वलन केले. नेपाळच्या राष्ट्रशिष्टाचारा प्रमाणे नेपाळचे राष्ट्रगीत व त्यानंतर लष्कराच्या बँडने राष्ट्रगानाची धुन वाजवून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी बनवण्यात आलेल्या विशेष रुद्राक्ष लिंगाचे पूजन अण्णासाहेब मोरे यांच्यासह नेपाळच्या उपराष्ट्रपती रामसहाय प्रसाद यादव यांनी केले. त्यानंतर अण्णासाहेब मोरे यांनी हजारो जनसमुदयास संबोधित केले. 


एक लाख रुद्राक्षांची अकरा फूट उंच पिंड


दरम्यान या कार्यक्रमासाठी 300 फूट रुंद आणि 700 फूट लांब असा भव्य मंडप तर 25 फूट रुंद व 80 फूट लांब असे सोहळ्यास साजेसे व्यासपीठ उभारण्यात आले होते. तसेच मुख्य आकर्षण म्हणून एक लाखापेक्षा अधिक रुद्राक्षांची अकरा फूट उंच भव्य पिंड बनविण्यात आली. यज्ञयाग विभागातील सेवेकरी ही पिंड बनविण्याचे काम गेली अनेक दिवस करत होते. त्याचबरोबर प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी मंडप, व्यासपीठ उभारणी, ध्वनी, प्रकाश योजना,पार्किंग, सुरक्षा व्यवस्था, महाप्रसाद तयारी, वाटप, येणाऱ्या भाविकांची निवास व्यवस्था, येणाऱ्या भाविकास सर्व गोष्टींचे मार्गदर्शन करणे अशा सर्व लहान, मोठ्या गोष्टींसाठी जबाबदारी सेवेकऱ्यांनी केली.