नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. गंगापूर धरणासह (Gangapur Dam) सहा धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अनेक भागांत मंदिरे, पुल, रस्ते आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक गावांचा संपर्क देखील तुटला असून जिल्ह्यातील विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
भाम धरण परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले पाणी
पहिली घटना इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील काळूस्ते येथे घडली आहे. येथील भाम धरणातून शनिवारी सोडलेल्या अतिरिक्त विसर्गामुळे नाल्याचे व नदीचे पाणी मौजे. काळूस्ते येथील घरांमध्ये शिरले होते. त्यानंतर प्रशासनाने पाच ते सहा कुटुंबे व अंदाजे २० ते २२ लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तर संभाव्य धोका लक्षात घेता प्रवाहामध्ये येणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
घराची भिंत कोसळली
दुसरी घटना इगतपुरी तालुक्यातील मौजे कानडवाडीत घडली आहे. येथील भीमा काळू पडवळे यांच्या राहत्या घराची भिंत पहाटेच्या सुमारास घडली असून यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर पंचनामाची तजवीज ठेवून प्राथमिक अहवाल सादर केला जाणार आहे.
पुरात वाहून गेल्याने महिलेचा अंत
तिसरी घटना शनिवारी रात्री सुरगाणा तालुक्यात घडली आहे. सुरगाणा तालुक्यातील मौजे. चिचंदा (गहाले) येथील मंगला अमृत बागुल या नदी पार करत असताना अचानक नदीला आलेल्या जोराच्या पुरामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. त्यानंतर आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह नदीकाठी आढळून आला आहे.
नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे : दादा भुसे
राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. नदी काठावरील नागरिकांनी पुराची पातळी लक्षात घेवून आपले पाळीव प्राण्यांची देखील सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वोतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सरकारी यंत्रणा फिल्डवर आहेच मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहत गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
आणखी वाचा