नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. गोदावरी नदीला (Godavari River) यंदाच्या पावसाळ्यातला पहिलाच पूर आल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) 80 भरल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर गंगापूर धरणातून आज दुपारी पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस सुरु असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर गंगापूर, दारणा, नांदूरमध्यमेश्वर, कडवातून विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग
विसर्गाच्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणाच्या गेटच्या देखभाल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. गंगापूर धरणातून आज दुपारी 12 वाजता एकूण 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे. तर दुपारी 3 वाजता एकूण 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ज्या गेट मधून पाण्याचा विसर्ग होणार आहे त्या गेटची देखभाल दुरुस्ती सुरू झाले. गेटच्या व्हीललाला ग्रीस लावून गेट सहज उघडतील, विना अडथळा विसर्ग व्हावा यासाठी उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. गंगापूर धरणाचा पाणीसाठा 80 टक्क्यांवर गेल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. आज दुपारी गंगापूर धरणातून यंदाच्या मोसमातील पहिला विसर्ग होणार आहे.
चांदोरीतील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली
नाशिक जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीच्या कडेला असलेला चांदोरी, सायखेडा, करंजवन गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. चांदोरी गावातील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली गेली असून चांदोरी गावाच्या आजूबाजूची शेती देखील पाण्याखाली गेली आहे. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आता गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस असल्यानं काही दुर्घटनाही घडल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील कानडवाडी इथल्या भीमा काळू पडवळे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुरगाणा तालुक्यातील मौजे चिंचदा इथल्या मंगला अमृत बागुल या नदी पार करत असताना पाण्याचा जोर वाढल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
आणखी वाचा