Nashik Rain Update : गेल्या दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस (Rain) हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी नाशिक शहरात (Nashik News) जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी शहराला पावसाने झोडपले. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. 


नाशिक शहरात आज दुपारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी नागरिकांकडे रेनकोट व छत्री नसल्याने त्यांनी लपण्यासाठी ठिकठिकाणी दुकानांच्या गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे दिसून आले.


शहरातील सकल भागात रस्त्यांवर साचले पाणी 


शहरातील सिडको, सातपूर, सीबीएस, शालीमार या परिसरासह आदी भागांत पावसाने हजेरी लावली.  शहरातील सकल भागात पावसाने रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तासाभराच्या पावसाने नाशिकच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 


उड्डाण पुलावरून रस्त्यावर कोसळले धबधबे


दरम्यान, शुक्रवारी पहिल्याच पावसात सरकारी कामाची दैना उडाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (National Highway Authority) गलथान कारभारामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. उड्डाणपूलावरील पाण्याचा नाचरा होण्याची व्यवस्था नसल्यानं, उड्डाणपुलावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याला अक्षरशः धबधब्याचे रूप दिसून आले. उड्डाणपूलाखाली अर्धवट अवस्थेत पाईप असल्यानं पुलावरील पाणी धोधो रस्त्यावर पडत होते. यामुळे पुलाखालून जाणाऱ्या नागरिकांची धांदल उडाली होती. 


शहरात नालेसफाईच्या कामांना वेग


नाशिक शहरात मागील अनेक दिवसांपासून डेंग्यू मलेरियाची साथ सुरू आहे. नाशिक शहरातील नंदिनी नदी (Nandini River) ही डासांच्या उत्पत्तीचे प्रमुख हॉटस्पॉट बनत असताना आता पालिका प्रशासनाने नंदिनी नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. शहरातील आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना आता नाशिक महानगरपालिका ॲक्शन मोडवर आल्यास पाहायला मिळत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या


सोलापुरात आठ दिवसापासून मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात पाणी


Nashik Rain : झाडे कोसळली, 25 कांदाशेड उद्ध्वस्त, दोघांचा दुर्दैवी अंत; नाशिकला पावसानं चांगलंच झोडपलं