Solapur Rain News : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. अनेक भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सोलापुरात (Solapur) मागच्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोलापूरच्या लिमयेवाडी (Limayewadi of Solapur) परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. मागच्या चार दिवसांपासून नागरीक जागून रात्र काढत आहेत.
पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल
पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं आहे. तसेच अन्नपाण्याचीही अडचण निर्माण झाली आहे. सोलापूर महापालिका प्रशासनाने याची तात्काळ दखल घेण्याची मागणी लिमयेवाडी परिसरातील नागरिक करत आहेत.
जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस
दरवर्षी जून महिन्यात एवढा मोठा पाऊस कधीच पडत नाही. साधारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होत असते. मात्र, यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जर वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस मागील आठवडाभरात झाल्याने बळीराजा आनंदी आहे. खरीप पिकासाठी या पावसाचा फायदा होणार आहे. एकीकडे हा पाऊस आनंद जरी देत असला दुसरीकडे याच पावसाचा फटका अनेक नागरिकांसह शेतकऱ्यांना बसला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळिंब, टरबूज, केळी इत्यादी फळ पिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसलाय.
कासेगावमधील ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरु
कासेगाव येथील ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा अग्निशमन दलातर्फे शोध सुरु आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे कासेगाव येथील ओढ्याला प्रचंड पाणी आलं होतं. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने गावातील तीन व्यक्ती ओढ्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यापैकी दोघे बचावले होते. मात्र ज्ञानेश्वर कदम हा तरुण बेपत्ता झाला आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर दुचाकी देखील वाहून गेली होती. दुचाकी सापडली आहे, तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान ओढ्यावरील पूल कमी उंचीचा बांधल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप गावाचे सरपंच यशपाल वाडकर यांनी केला आहे. जास्त उंचीचा पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.
महत्वाच्या बातम्या: