Nashik Police Transfer नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलात आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या बदल्यांचे वारे वाहत आहेत. नाशिकचे माजी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांनी पदभार सोडण्यापूर्वी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट केली आहे. ग्रामीण दलात 6 पोलीस निरीक्षक, 7 सहाय्यक निरीक्षक व 5 उपनिरीक्षकांच्या बदल्या शहाजी उमाप यांनी केल्या आहेत.
पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या बदलीपूर्वी ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती केली, तर राजू सुर्वे यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी दिली आहे.
ग्रामीण पोलीस दलात खांदेपालट
मालेगाव कॅम्पचे दिलीप खेडकर यांची नाशिक तालुका पोलीस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील दत्तात्रय लांडगे यांची मनमाड पोलीस ठाण्यात, चांदवडचे रवींद्र जाधव यांची मालेगाव कॅम्पला व नियंत्रण कक्षातील श्रद्धा गंधास यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील सुनील भाबड, दत्ता चौधरी यांची जिल्हा वाहतूक शाखेत, नव्याने हजर झालेले अरुण धनवडे यांची ओझर पोलीस ठाण्यात, नव्याने हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांची नांदगाव पोलीस ठाणे, दिलीप राठोड यांची सिन्नर, राकेशसिंह परदेशी यांची दिंडोरी पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ यांची लासलगावला, लासलगावचे अशोक मोकळ यांची नियंत्रण कक्षात, विजय सोनवणे यांची निफाड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वाचक म्हणून नेमणूक झाली आहे. नव्याने हजर झालेले हनुमान उगले यांची सिन्नरला, नांदगाव पोलीस ठाण्यातील कल्याणी पाटील यांची नियंत्रण कक्षात नेमणूक झाली आहे.
नाशिकमध्ये रविवारपासून राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा
महाराष्ट्र पोलीस दलाच्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत आहेत. स्पर्धेला रविवारपासून (दि. 04) प्रारंभ होत असून, या स्पर्धेचे संयोजन नाशिक शहर पोलीस आयुक्तालय करीत आहे. स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलीस खेळाडू सहभागी होत आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे पोलीस क्रीडा स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. या वेळी स्पर्धांना प्रारंभ झाला असून, गेल्या डिसेंबरमध्ये विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा परिक्षेत्रानिहाय पार पडल्या. त्यानंतर आता राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा होत आहेत. या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत आहेत.
आणखी वाचा
मोठी बातमी! राज ठाकरेही घेणार काळाराम मंदिराचे दर्शन; म्हणाले "अयोध्येचीही मूर्ती काळी, आपले..."