नाशिक : सकल हिंदू समाजातर्फे (Sakal Hindu Samaj) पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान (Nashik Band) दुकाने बंद करण्यावरून दोन गटांत शुक्रवारी वाद झाल्याने दगडफेकीची घटना घडली. दगडफेकीच्या घटनांवर पोलिसांनी (Nashik Police) नियंत्रण मिळविले. शुक्रवारी असलेले तणावाचे वातावरण आता निवळले असून नाशिक (Nashik) शहर पूर्वपदावर आले आहे. 


दगडफेकीच्या घटनांत दोन पोलीस उपायुक्तांसह काही कर्मचारी जखमी झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीतील फुटेज पाहून आतापर्यंत सुमारे वीस जणांना अटक केली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पन्नासहून अधिक जणांवर आसपास दंगेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अजूनही सीसीटीव्हीच्या फुटेज तपासून दंगेखोरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


नेमकं काय घडलं? 


बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नाशिक बंदची हाक हिंदू समाज बांधवांतर्फे देण्यात आली होती. दुपारच्या दरम्यान दोन गट रॅलीदरम्यान आमनेसामने आले. दुकाने बंद करण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर दगडफेकीत झाले होते. जुन्या नाशिक भागात मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू झाल्यामुळे ठिकठिकाणी दगडांचा व विटांचा खच पाहावयास मिळाला. यात काही वाहनांचेही नुकसान झाले.


वीस जणांना अटक 


जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलिसांनी आता समाजकंटकांचा शोध घेत सुमारे वीस जणांना अटक केली आहे. तर पन्नासहून अधिक समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पालकमंत्री दादा भुसेंकडून प्रशासनाचे कौतुक


दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील परिस्थितीचा आढावा घेरण्यात आला. शांतता अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी पोलीस प्रशासनाला केल्या. तसेच घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही दादा भुसे यांनी पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी संवेदनशीलपणे नाशिकमधील घटना हाताळल्याने पोलीस प्रशासनाचे पालकमंत्री भुसे यांनी कौतुक केले. येणाऱ्या काही दिवसांत सर्व धर्मीय सण उत्सव सुरू होत असल्याने पोलिसांनी अधिक सतर्क राहावे आणि शहरातील नागरिकांनीही शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.


आणखी वाचा 


Nashik News : नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा रात्रभर पहारा, पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक