Maharashtra Nashik News: सुरवातीला दुर्मिळ गिधाड असणाऱ्या परिसरात काही वर्षात तब्बल अडीचशेहुन अधिक गिधाडांचे संवर्धन करण्यात आले. त्यांची जपणूक करण्यात आली. मात्र सद्यस्थितीत निधी अभावी आणि वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Tehsil) खोरीपाडा गिधाड रेस्तराँ बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 


पर्यावरणाचा अविभाज्य भाग म्हणून ओळख असलेल्या दुर्मिळ अशी गिधाडे वाचवण्यासाठी संवर्धन होणे आवश्यक आहे. एकीकडे समुद्रात कासव ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवण्याचे काम करतो, त्याचप्रमाणे जमिनीवर स्वच्छता ठेवण्याचे काम गिधाड करत असतात. याच पार्श्वभूमीवर 2011 साली नाशिक वनविभागाच्या वतीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खोरीपाडा अनोखे गिधाड उपहारगृह उभारण्यात आले होते. विशेष म्हणजे, वनविभागाच्या वतीने राबविण्यात आलेला हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. यामुळे परिसरातील गिधाडांची भरही पडली होती. वनविभागाची ही मोहीम गिधाड संवर्धन आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी पूरक ठरत होती. मात्र अलीकडच्या दिवसांत हे चित्र बदलले असून वनविभागाच्या उदासीनतेमुळे गिधाड रेस्तराँ शेवटचा घटका मोजत आहे.


पर्यावरणीय अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आणि स्वच्छतादूत म्हणून गौरविल्या जाणाऱ्या गिधाडांचे अस्तित्व हरसूल वाघेरा घाट परिसराच्या कड्या कपारीत टिकून आहे. त्यांचे संवर्धन करण्यासाठी वनविभागाने गिधाड उपहारगृह ही योजना राबवून प्रयत्न देखील सुरू केले. यासाठी स्थानिक खोरीपाडा येथील शंकर बाबा शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली. निसर्गमित्र म्हणून ओळख असलेल्या शिंदे यांनी जबाबदारी यशस्वीरित्या पेललीसुद्धा, खोरीपाडा गावठाण शिवारात हे उपहारगृह उभारण्यात आले. सुरवातीला या परिसरात मोजके गिधाड निदर्शनास आले होते. मात्र गिधाड उपहारगृह सुरू केल्यानंतर यात कमालीचा बदल होऊन वनविभागाचा गिधाड संवर्धनाचा प्रयोग यशस्वी झाला. त्याचबरोबर 73 वर्षीय शंकर शिंदे यांनी या काळात यशस्वीरित्या जबाबदारी पेलवली. मात्र सद्यस्थितीत गिधाड रेस्तराँकडे लक्ष देणारे कुणी नसल्याने गिधाड संवर्धनाची मोहीम अर्ध्यात बंद पडण्याची आली आहे. वनविभागाने वेळीच याकडे लक्ष देऊन ही मोहीम सुरू ठेवली पाहिजे. 




वैद्य शंकर शिंदे म्हणाले की, पंचक्रोशीत वैद्य म्हणून आजही प्रसिद्ध आहे. तेव्हापासून निसर्ग उपचार करत होतो, शिवाय पक्षांवर काम करायचं होतं. त्यानंतर गिधाड संवर्धनाची संकल्पना सुचली. जेव्हा वनविभागाने गिधाड संवर्धन सुरू करण्याचा सांगितलं. एका पायावर तयार झालो. तेव्हा अनेक भागात ओळख असल्याने अनेकजण गिधाडांच्या खाद्यासाठी संपर्क साधत असत. हळुहळू गिधाडांची संख्या वाढत गेली. त्यावेळी दर दोन दिवसाआड खाद्य टाकले जाई. त्यामुळे सुरवातीला केवळ 20 हुन अधिक गिधाडे होती, मात्र त्यानंतर जवळपास 250 हून अधिक गिधाडांचे संवर्धन करण्यात यश आले.


वनविभागाचे दुर्लक्ष...


अलीकडच्या वर्षांत वनविभागाने इकडे दुर्लक्ष केले आहे. खाद्य वेळेवर मिळत नाही, खाद्य आणण्यासाठी लांब जावं लागत. खाद्य आणण्यासाठी कुणी ट्रॅक्टर देत नाही, ट्रॅक्टर मिळाला तर पेट्रोल डिझेलचा खर्च कुठून आणायचा, असा प्रश्न पडतो. निधी येतो पण दुसरीकडे वापरला जातो. साधारण एक जनावर आणायचं म्हणजे, जवळपास हजार ररुपये खर्च येतो. सोबतीच्या माणसाला शंभर रुपये दयावे लागतात. आधी दिवसाआड खाद्य दिले जाई, पण आता महिना होऊनही खाद्य मिळत नाही. आता वयाच्या मानाने होत नाही, आतापर्यंत जबाबदारी पार पाडली, यानंतर वनविभागाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.