नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकीकडे जळगावच्या (Jalgaon) दौऱ्यावर असताना दुसरीकडे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी राजीनामा (Resignation) दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


शिर्डीत नव्या संपर्कप्रमुखांची निवड केल्याने तसेच भाऊसाहेब वाकचौरे (Bhausahab Wakchaure) यांना लोकसभेचं तिकीट जवळपास निश्चित मानले जात असल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं म्हटलं जात आहे. दरम्यान, बबनराव घोलप सध्या आऊट ऑफ कव्हरेज आहेत.  


वाकचौरेंच्या उमेदवारीची चर्चा आणि घोलप यांची नाराजी 


सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव यांनी सूचनादिल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ होते. यानंतर बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. तसंच वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीला देखील विरोध केला होता.


ठाकरे गटाला मोठा धक्का


उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी बबनराव घोलप यांची ओळख आहे. माजी मंत्री असलेले बबन घोलप हे देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा ठाकरे गटासाठी धक्का समजला जात आहे.


मग मला शब्द का दिला होता? : घोलप


दरम्यान, याबाबत बबनराव घोलप यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, "मी माझ्या उपनेते पदाचा राजीनामा देतोय. अमरावती किंवा शिर्डी मला विचारले होते मी शिर्डी सांगितले होते. मी 8 महिने काम केले, 30 शाखांचं उद्घाटन केले. भाऊसाहेब वाकचौरे, जे गद्दार होते त्यांना पक्षात घेत आहेत, असं मला कळताच मी उद्धव साहेबांना विचारले होते. भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवार करायचे होते तर मला शब्द का दिला होता? माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा मी उद्धव ठाकरेंना व्हॅट्सअॅप केला. संजय राऊतांनी मला उद्या भेटायला बोलावले आहे आणि मी जाणार आहे."


हेही वाचा


Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा निवडणूक समीकरण बदललं, भाऊसाहेब वाकचौरे यांची घरवापसी, आतापर्यंतचा इतिहास कसा?