जळगाव : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जळगाव दौऱ्यानंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे देखील आज जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर आहेत. आज जळगावमध्ये विविध कार्यक्रमांसह मानराज चौकातील मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच अहमदनगर दौरा केला, त्यांनतर आज जळगावमध्ये दौरा करत असल्याने आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. 


उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाले असून महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक भागात सध्या त्यांचे दौरे सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच ते जालना येथील सराटी गावात जाऊन आंदोलकांशी भेट घेतली होती. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी दौरा केला, आज जळगाव शहरात दौरा आहे. आज सकाळी ते खाजगी विमानाने साडेदहा वाजता जळगाव (Jalgaon) शहरात दाखल होतील. त्यानंतर अकरा वाजता महापालिका प्रांगणात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे ते अनावरण करतील. त्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजता ते पिंपळा परिसरात शिवस्मारकाचे लोकार्पण करतील. त्यानंतर एक वाजता मानराज चौकातील मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. दुपारी अडीच वाजता जळगाव विमानतळावरुन ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. 


दरम्यान उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना शहरातील महापालिकेच्या आवारात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा अनावरण करण्यात येणार आहे. मात्र या पुतळा अनावरणावरुन भाजप शिवसेनेमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाच्या मागणीनंतर या पुतळ्यांचे अनावरण राजकीय शिष्टाचारानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे शासनाचे पत्र महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे. दुसरीकडे पुतळा अनावरणावरुन भाजपकडून राजकारण होत असल्याचा आरोप करत संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्यांचे अनावरण करणार असल्याची भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली. 


उद्धव ठाकरे आज काय बोलणार? 


उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरे करत आहेत. जनतेशी संवादाबरोबरच शेतकऱ्यांशी देखील संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर येत असून शहरात जाहीर सभा होत आहे. अहमदनगर दौऱ्यातही अनेक ठिकाणी भेटी देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकारच्या योजनांच्या गौडबंगलाविषयी टीका केली होती. त्यामुळे आज जळगावमध्ये काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. जळगाव शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे सर्वच आमदार शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत शिवसेना ठाकरे गटाकडून पाचोरा येथील वैशाली सूर्यवंशी या सोबत आहेत, त्यामुळे आज काय बोलणार याकडे जळगाववासियांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Udhhav Thackeray : 'ज्या हेलिकॉप्टरने गावाकडे जाता, त्याचं हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांच्या बांधावर या', उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं