CM Eknath Shinde At Sinnar : शिर्डीच्या साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा दर्शनानंतर हेलिपॅडकडे न जाता अचानक सिन्नर (Sinnar) तालुक्याच्या दिशेने वळला. वावी गावाजवळील मिरगावच्या श्री इशानेश्वर मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक दर्शन घेतलं. दुग्धभिषेक करत पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री हे केवळ दर्शनासाठी श्री इशानेश्वर मंदिरात आले नव्हते तर आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी आले होते अशी चर्चा आहे.


मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोरील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना केली : देवस्थान
श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कॅप्टन अशोक खरात हे अंकशास्त्राचे अभ्यासक आहेत. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटीसह व्यापारी, उद्योजक त्यांच्याकडे मार्गदर्शनसाठी जात असतात. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांच्याकडे जाऊन स्वतःचे म्हणजेच सरकारचे भवितव्य जाणून घेतल्याची चर्चा आहे. परंतु याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कॅप्टन अशोक खरात या दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही. देवस्थानच्या विश्वस्तांनी मुख्यमंत्री देवदर्शनसाठी आले होते, शेतकरी तसंच जनतेसमोरील अडचणी, संकटं दूर व्हावीत यासाठी प्रार्थना केल्याची माहिती दिली आहे. 


अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून निषेध
दुसरीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र या प्रकरणी आवाज उठवला आहे. "मुख्यमंत्री नाशिकमधल्या एका ठिकाणी ज्योतिष पाहण्यासाठी गेल्याची सध्या चर्चा आहे. हे जर खरं असेल तर ते अत्यंत वेदनादायी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचं, मुख्यमंत्र्यांचं वर्तन अत्यंत बेजबाबदार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याचा निषेध व्यक्त करते. ज्योतिष हे शास्त्र स्वप्न विकण्याची कला आहे, थोतांड आहे, असं आम्ही वारंवार सिद्ध केलं आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने असं कृत्य करणं म्हणजे समाजात चुकीचा संदेश परवण्यासारखं आहे, याचा आम्ही निषेध व्यक्त करतो," असं महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी म्हटलं आहे. तसंच ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचे सिद्ध केल्यास एकवीस लाख रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केलं आहे.


मुख्यमंत्र्यांचा सिन्नर दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल शिर्डीला गेले होते. साई मंदिरात त्यांनी पाद्यपूजा केली. तसंच त्यांच्या हस्ते आरती देखील झाली. शिर्डीहून मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक सिन्नरकडे वळला. सिन्नर तालुक्यातील श्री इशानेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. त्यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. जवळपास 50 मिनिटे मुख्यमंत्री या ठिकाणी होते. अचानक ठरलेल्या या दौऱ्यामुळे इतर यंत्रणांची धावपळ उडाली होती.