नाशिक: राज्यपाल भगतसिंग कोशारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या वक्तव्याने राज्यभरात वातावरण तापलं आहे. आता हे लोन ग्रामीण भागातही पसरू लागले आहे. नाशिक जिल्ह्यातील जाखोरी (Nashik Jakhori Gramsabha) या गावाने थेट राज्यपालांना हटवा अशा प्रकारचा ठरावाच केल्याचे समोर आले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्यानंतर राज्यभरात तीव्र असंतोष आहे. अनेक पक्ष संघटनांकडून वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. नाशिक शहर जिल्ह्यातून आंदोलने करण्यात येत आहेत. आता हे लोण थेट ग्रामीण भागात पोहोचले आहे. जाखोरी येथील गावकऱ्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवा असा ठराव करण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील जाखोरी येथील ग्रामपंचायतीच्या तरुण सदस्यांनी पुढाकार घेत ग्रामसंभा घेतली. त्यात जाखोरी ग्रामस्थाच्या बैठकीत कोशारी विरोधात निषेधाचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. लवकरच याबाबत ग्रामसभेतील ठराव म्हणून नियमानुसार पुढील प्रक्रीया करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य राहुल धात्रक यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी `छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुने जुने आदर्श झाले असे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांचा निषेध म्हणून राज्यपाल कोशारी व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते त्रिवेदी यांच्या विरोधात राज्यभरात निषेध मोर्चे, जोडे मारो आदोलन सुरु आहे.
नाशिक शहरासह आता ग्रामीण भागातही त्याचे लोण पसरले आहे. रोज विविध भागात आंदोलन व निषेध करून नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. जाखोरी गावात काल झालेल्या ग्रामसभेत देखील राज्यपालाच्या विरोधात निषेधाचा ठराव करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा जोडे मारो आंदोलन झाले. त्यानंतर राज्यपाल हटावच्या घोषणा ग्रामसभेत देण्यात आल्या.
भाजप नेत्यांकडून बेताल वक्तव्य
यावेळी उपस्थित सदस्यांसह गावकऱ्यांनी राज्यपालांसह भाजपा प्रवक्त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. भाजपा नेत्यांकडून जाणूनबुजून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे, भाजप नेते वेळोवेळी छत्रपती शिवरायांचा अपमान करून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आम्ही मोठे आहोत, असा गर्व त्यांना झाला आहे, अशी टीकाही गावकऱ्यांनी केली आहे. राज्यपाल हटवा आणि महाराष्ट्र वाचवा असे गावकऱ्यांचे मत असल्याचे सदस्यांनी सांगितले.