Nashik News : चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर (Shree Saptashrungi Nivasini Devi) राज्यभरातील भाविक भक्त दर्शनासाठी येत आहेत. अशातच जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून वणी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांवर अचानक काही संशयितांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात 2 एप्रिलपर्यंत संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे.


दोन गट आपापसांत भिडले, वातावरण बिघडले


नाशिकच्या (Nashik) वणी सप्तशृंगी गडावर गुरुवारपासून चैत्रोत्सव सुरु झाला आहे. सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक, नागरिक गडावर जात आहेत. अनेकजण बसमधून, कोणी पायी दिंडी वारीच्या माध्यमातून गडावर जात आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील काही गावकरी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर निघाले होते. वाटेत काही संशयितांनी 28 मार्च रोजी दिंडीवर दगडफेक केली. त्यामुळे दोन गट आपसात भिडून परस्परांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे वातावरण बिघडले होते. 


संचारबंदी 2 एप्रिलपर्यंत वाढवली


दरम्यान घटनेची माहिती मिळताच एरंडोलचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व जनजीवन सुरळीत राहावे, याकरता 29 मार्च सकाळी 11 वाजेपासून ते 31 मार्चपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते. मात्र त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावातील परिस्थितीची पाहणी केली असता आणि कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आज (31 मार्च) शुक्रवार रोजी आठवडे बाजाराचा दिवस असल्याने, तसेच सध्या रमजानचा महिना असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे गर्दीची शक्यता लक्षात घेऊन संचारबंदी आदेश वाढवण्यात आला आहे.


आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई


त्यानुसार संबंधित प्रशासनाने धरणगाव तालुक्यातील पाळधी बु. आणि पाळधी खु. संचारबंदी वाढवून 2 एप्रिलपर्यंत सकाळी 11.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहे. दरम्यान सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तिविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


खान्देशातून मोठ्या प्रमाणावर भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला


चैत्रशुद्ध पौर्णिमेनिमित्त वणी इथे सप्तशृंगी गडावर खान्देशातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी जात असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी जाणे शक्य नव्हते. मात्र यंदा हजारो भाविक पायी वणीच्या दिशेने रवाना झाले असून शिरपूर तालुक्यातील शेवटच्या टोकापासून किमान 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास करत हे भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी रवाना होत असतात.