Nashik Shivsena : सत्तांतरानंतर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहबे ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट (Shinde Sena) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नाशिकमध्ये देखील याचे पडसाद नेहमीच पाहायला मिळत आहेत. अशातच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शहरात दोन पाहायला मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मध्यवर्ती कार्यालय तर पहिल्यापासून आहेच, मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले असून लोकार्पण सोहळा पार पडतो आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली नाशिक (Nashik) जिल्ह्यात शिवसेनेने आपल्या कार्याचा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. शहरासह जिल्ह्यात विकास कामांचा बार उडवून देतांनाच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मायको सर्कल परिसरात शिवसेनेचे अद्ययावत प्रशस्त कार्यालय तयार करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन खा. डॉ. श्रीकांत शिंदे (Shreekant Shinde) यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी पत्रकार परिषदेत दिली.


शहरातील मायको सर्कल परिसरात हे भव्य कार्यालय उभारण्यात आले असून कार्यालयात पदाधिकार्‍यांना कामकाज करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. तसेच कार्यकर्त्यांसोबत बैठका घेण्यासाठीही बैठक हॉल तयार करण्यात आला आहे. वॉर रुमचेही येथे व्यवस्था करण्यात आली आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्ष असतील. यात प्रामुख्याने वैद्यकीय कक्ष, विधी सल्ला कक्ष, सहकार सल्ला कक्ष, ग्राहक संरक्षण कक्ष आणि सरकारी योजनांची माहिती देणारा कक्ष असेल, असेही अजय बोरस्ते म्हणाले.


स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष 


महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्वतंत्र वैद्यकीय सहायता कक्ष उभारण्यात आला आहे. नाशिक शहरात सिव्हिल हॉस्पिटलासह इतर सरकारी हॉस्पिटल असून महत्वाच्या शस्रक्रियांसह इतर आजारांवर उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्ह्यात असे असंख्य रुग्ण असून आर्थिक परिस्थितीमुळे उपचार करणे शक्य होत नसते. हीच बाब लक्षात घेत शिवसेनेच्या नव्या कार्यालयात वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यात गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करणे आणि सर्वसामान्य परिस्थितीच्या रुग्णांना उपचार प्रणालींची योग्य माहिती देण्याचा उद्देश आहे. 


विधी सहाय्यता कक्ष


एकीकडे नागरिकांना वैद्यकीय मदतीची गरज असतांना दुसरीकडे विधी साक्षरतेच्या अभावानेही त्यांची फसवणूक होते. योग्य कायदेशीर सल्ला न मिळाल्याने लोकं चुकीचे पाऊल उचलू शकतात. तसेच त्यांची आर्थिक फसवणूक होऊ शकते. वकीलांची फी जर जास्त असेल तर ती सर्वसामान्यांना परवडत नाही. या बाबी लक्षात घेत लीगल सेलची निर्मिती पक्ष कार्यालयात करण्यात आली आहे. सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजे दरम्यान या कक्षात प्रथितयश वकील उपलब्ध असतील.